ग्रामपंचायत निवडणूक जीवावर बेतली! माघार घेतल्याने चिडवल्याच्या रागाने हल्ला: आयुक्त

0

प्रतिशिर्डी शिरगावचे (ता. मावळ, जि. पुणे) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचा १ एप्रिलला झालेला निर्घूण खून हा चार महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अपमानातून झाल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त (देहूरोड विभाग) पद्माकर घनवट यांनी सांगितले. त्यामुळे तो त्यांच्या प्लॉट विक्रीच्या धंद्यातून झाल्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

गोपाळेंचा खून करण्यापूर्वी तिन्ही मारेकऱ्यांनी घटनास्थळाची रेकी केली. ते हल्ला चढविण्यास येण्यापूर्वी एकदा तेथील पाहणी दुचाकीवरून करून गेले होते. त्यांनी त्यापूर्वी तीनदा गोपाळेंना मारण्याचा कट केला होता. मात्र, ते एकटे न सापडल्याने त्यांचा प्रयत्न फसला होता. त्यामुळे अखेरीस त्यांनी भर चौकात गावातील साई मंदिरासमोर गर्दीत त्यांना मारण्याचे धाडस केले. १ तारखेच्या रात्री साडेनऊ वाजता या त्रिकूटाने कोयत्याने सपासप वार करून चार महिन्यांपूर्वीच सरपंच झालेल्या गोपाळेंचा खून केला.

अधिक वाचा  पुण्यात रात्रीत सर्वात मोठी घडामोड; पवारांची बिन आवाजाची काठी चालली अन् ‘देवाभाऊं’चे मनसुबे उधळले

गोपाळेंच्या खूनाने मावळ तालुका हादरून गेला. गावकऱ्यांनी मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिस ठाण्यासमोर धरणे धरले. त्यानंतर नुकतीच (ता.५) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गोपाळे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर देत पोलिसांना सूचना दिल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी वेगाने तपास सुरु करीत दुसऱ्याच दिवशी चार आरोपींना अटक केली. त्यासाठी साई मंदिरासमोरील सीसीटीव्हीची मोठी मदत झाली. त्यानंतर दोन दिवसांनी तीन मारेकऱ्यांच्याही मुसक्या आवळल्या. हल्लेखोरांत मृत सरपंच गोपाळेंचा पुतण्या, तर एक आरोपी हा त्यांच्या विरुद्ध लढलेल्या पॅनेलमधील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डिसेंबर २०२२ मध्ये शिरगावची निवडणूक बिनविरोध झाली होती. शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या निर्णयानुसार प्रवीण गोपाळे हे थेट जनतेतून बिनविरोध सरपंच झाले. तसेच त्यांचे पॅनेलही बिनविरोध निवडून आले. समोरच्या पॅनेलमध्ये असलेल्या व या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपीने सरपंच निवडणुकीतून माघार घेतल्याने त्याला इतर सारखे चिडवत होते. हा अपमान सहन न झाल्याने त्याने गावातीलच तरुणांना हाताशी धरीत नवनिर्वाचित सरपंच गोपाळेंना ठार मारण्याचा प्लॅन करून तो अंमलात आणल्याचे पोलिस तपासात आढळले. सध्या सर्व आरोपी हे पोलिस कोठडीत आहेत.

अधिक वाचा  अजित पवार गटातही नाराजीनाट्य; पुण्यातील बडा नेता राजीनामा देणार?