मंत्रिमंडळ खाते वाटपावर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, महाभारताचा दाखला देत महायुतीवर थेट हल्लाबोल

0
2

शनिवारी मंत्र्यांना खात्याचं वाटप झालं, यावर प्रतिक्रिया देताना आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे सरकार कौरवा सारखं वागत असून आपसात लढून यांचा कार्यक्रम संपणार आहे. मलाईदार जिल्हा आणि मलाईदार खात्यासाठी याची लढाई चालली आहे. जनतेच्या प्रश्नांचं यांना काही देणं-घेणं नाही. आता पालकमंत्रिपदासाठी सुद्धा यांच्यामध्ये भांडण होणार आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, हिंमत असेल तर मारकडवाडीत बॅलेटच्या माध्यमातून या सरकारने मॉकपोलिंग घेतलं पाहिजे. जनतेचं मत चोरून हे सरकार आलं आहे. निवडणूक आयोगाने जे काही नोटिफिकेशन काढलं त्यावरून असं वाटतं दाल मे कूच काला है, असा घणाघात नाना पटोले यांनी सरकारवर केला आहे.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली होती. या टीकेला देखील यावेळी पटोले यांनी उत्तर दिलं आहे. नौटंकी आणि हिटलरशाही या दोन शब्दाचा वापर केला पाहिजे. लोकशाहीत हुकूमशाहीचा वापर केला जात आहे. जनता रस्त्यावर येते तेव्हा कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हे दाखल केले जातात. भाजप हा लोकशाहीवर विश्वास न ठेवणारा पक्ष आहे. आम्ही लोकांवर लाठीचार्ज करून, गोळ्या झाडू आणि त्यांना गुलाम बनवू असं चित्र बावनकुळे यांच्या बोलण्यातून दिसतं असं पटोले यांनी म्हटलं आहे.

मागील वेळेस 20 हजार कोटींचं बजेट अजित पवार यांनी मांडलं होतं. येणारं बजेट आणखी किती तुटीचं असणार आणि त्याचा बोजा महाराष्ट्राच्या जनतेवर पडून महागाई वाढणार आहे. हे निवडणूक आयोगाच्या कृपेने बहुमतात आले आहेत. जनतेच्या कृपेने आलेले नाहीत. महागाई, शेतकरी यासाठी काय करणार? असा सवालही यावेळी नाना पटोले यांनी उपस्थित केला. मंत्रिमंडळ असो की वागणं दोन्ही संवेदनाहीन आहेत, या सरकारला संवेदना नाहीत असंही यावेळी पटोले यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा