गेल्या दोन दिवसापासून अवहेलना झाल्याचे शल्य मनात डाचत आहे. चर्चा करून पाऊल उचलावे लागणार आहे. घाई न करता काय करायचे आहे ते विचारपूर्वक निर्णय घेणार आहे. याबाबत मुंबईतील नेत्यांशी चर्चा करून पुढील पाऊल उचलणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मागासवर्गीयांसाठी लढत राहणार असून कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही, असेही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. नाशिक येथील समता परिषदेच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.






मंत्रीपदाची हाव मला नाही. मंत्रिपदाची हाव जर मला असली असती तर 17 नोव्हेंबरला मी राजीनामा दिला नसता. मराठा समाजाच्या आरक्षणाला मी कधीच विरोध केला नाही, असे म्हणत त्यांनी संपूर्ण भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले होते. त्यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी टीका केली.
येत्या काळात मी संपूर्ण राज्यात फिरणार आहे. पुन्हा एकदा ओबीसी समाजासाठी एल्गार पुकारणार आहे. सर्व ओबीसी समाज एकजुटीने उभा राहिला म्हणून मी तुमच्यासमोर उभा राहिलो आहे. काही लोकांचे आपल्याविषयी वेगळे मत झाले आहे. ओबीसी समाजासाठी शेवटपर्यंत लढत राहणारी माणसे कमी असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.
पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नाशिक लोकसभेसाठी माझे नाव घेतले होते. त्यामुळे या ठिकाणी तुम्हालाच उभे राहावे लागेल असा निरोप त्यांनी मला दिला होता. तिकीट नको असेल तर दिल्लीला जाऊन सांगा, असे त्यांनीच मला सांगितले होते. चार आठवडे झाले तरी मला काहीच निरोप आला नाही. त्यावेळी मी स्वतःच माझे निवडणुकीच्या रिंगणातून नाव मागे घेतले, असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
दोन वेळा राज्यसभेची उमेदवारी देताना मला टाळले. एकदा सुनेत्रा पवार यांना तर दुसऱ्यावेळी नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेतले. त्यानंतर राज्यात तुमची गरज आहे. त्यामुळे विधानसभा लढवावी लागेल, असे मला सांगण्यात आले, असेही भुजबळ म्हणाले.
मी माझ्या लोकांना आज सोडू शकत नाही. मी संपूर्ण राज्यात फिरणार आहे. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माझ्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा माझ्या मंत्रीपदासाठी प्रयत्न केले. मंत्रीपद कित्येकवेळा आले व गेले. काही काळ विरोधी पक्षातही बसलो, असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.













