जितेंद्र आव्हाडांनी छगन भुजबळांच्या नाराजीवर करुन दिली जुनी आठवण, म्हणाले “पवार साहेबांनी तळहाताच्या…”

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता छगन भुजबळांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. यामुळे ते लवकरच बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यातच आता छगन भुजबळ पुढील दोन दिवस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन याबद्दल चर्चा करणार आहेत. त्यातच आता छगन भुजबळांचे जुने सहकारी आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ नाराज असल्याचे कळताच जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी अनेक जुन्या गोष्टी नमूद केल्या आहेत. तसेच छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने कशाप्रकारे मान-सन्मानाने वागणूक दिली, याबद्दलही त्यांनी भाष्य केले. “छगन भुजबळ यांच्यावरील प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला आदरणीय पवार साहेब स्वतः उभे रहायचे”, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
“आज छगन भुजबळ साहेबांकडे बघताना एक विचार नक्कीच माझ्या मनात आला. ज्या दिवसापासून आदरणीय शरद पवार साहेबांसोबत छगन भुजबळ साहेब आले ; त्या दिवसापासून आदरणीय साहेबांनी त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले. भुजबळ साहेबांचा मानसन्मान हा पहिल्यांदा राखला जायचा. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ, पहिले उपमुख्यमंत्री छगन भुजबळ !

छगन भुजबळ यांच्यावरील प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला आदरणीय पवार साहेब स्वतः उभे रहायचे. १९८५ -९० च्या काळात पवार साहेबांना सर्वाधिक त्रास भुजबळांनीच दिला होता. हा सगळा राजकीय प्रवास बघितल्यावर भुजबळांच्या कर्तृत्वावर महाराष्ट्रात कोणाच्याही मनात शंका नसेल. आदरणीय साहेबांनी भुजबळांवर जेवढे प्रेम केले तेवढे कदाचित बाळा साहेबांनंतर कुणीही केले नसेल. मला माहित नाही का, पण राहून राहून वाटतेय की, आदरणीय शरद पवार साहेबांसारखा कार्यकर्त्यांना जपणारा नेता आजतरी महाराष्ट्रात नाही”, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
दरम्यान सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. “छगन भुजबळ यांना मंत्री का केलं गेलं नाही? हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र छगन भुजबळ आमच्याबरोबर असेपर्यंत आदरणीय शरद पवार साहेब यांच्या बरोबरीनेच छगन भुजबळ यांचा मान ठेवण्यात आला आहे”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

“छगन भुजबळ यांची खुर्चीही आदरणीय शरद पवार साहेबांच्या शेजारीच असे. प्रत्येक वेळी कुठलीही जबाबदारी देण्याचा विषय असे तेव्हा छगन भुजबळ यांचंच नाव पुढे असायचं. आदरणीय शरद पवार साहेब यांच्यासोबत छगन भुजबळ ताकदीने उभे राहिले हे मी कधीच विसरणार नाही. मागच्या दीड-दोन वर्षांत ज्या घटना घडल्या त्याला अनेक कारणं आहेत. मला त्यात आता पडायचं नाही. मात्र हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन