बॉलीवूड अभिनेता विक्रांत मेस्सीच्या घोषणेदरम्यान, त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचे प्रदर्शन संसद भवनाच्या बालयोगी सभागृहात आयोजित करण्यात आले होते. हे स्क्रीनिंग सोमवारी संध्याकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आले होते. यावेळी विक्रांत मेस्सी आणि राशी खन्ना यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह हा सिनेमा पाहिला. पंतप्रधान मोदींसोबत हा सिनेमा पाहिल्यानंतर विक्रांत मेस्सीने म्हटलं की, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता.






विक्रांत मेस्सीने पंतप्रधान मोदींसोबत पाहिला ‘द साबरमती रिपोर्ट’
विक्रांत मेस्सीने संसद भवनातील स्क्रिनिंगनंतर आनंद व्यक्त केला. त्याने म्हटलं की, ‘आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट पाहिला. त्यांच्याशिवाय सर्व कॅबिनेट मंत्रीही स्क्रीनिंगला उपस्थित होते. त्यांच्यासोबत चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पंतप्रधानांसोबत बसून चित्रपट पाहणं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद होता.
विक्रांत पुढे म्हणाला की, “पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सर्व मंत्र्यांसोबत चित्रपट पाहणे हा एक वेगळा अनुभव होता. तो मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही. या सर्वांसोबत मला हा चित्रपट पाहण्याची संधी मिळाली, हा माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण आहे.
राशी खन्नानेही व्यक्त केला आनंद
सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये अभिनेत्री राशि खन्नाही उपस्थित होती. चित्रपट पाहिल्यानंतर तिने म्हटलं की, “जेव्हा मी चित्रपट साईन केला, तेव्हा पंतप्रधान मोदी या चित्रपटाचे इतके कौतुक करतील, असं मला कधीच वाटलं नव्हतं. आज त्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून चित्रपट पाहिला. त्यांनी सांगितले की, चित्रपट बनल्यानंतर पंतप्रधान त्यांनी पाहिलेला हा पहिला चित्रपट आहे, माझ्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम क्षण आहे.










