आधी मणिपूर ‘सेफ’ करा!; संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्लाबोल

0

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. मणिपूर आणि आसामच्या सीमेवर असणाऱ्या जिरी नदीत एक महिला आणि दोन मुलांचा मृतदेह सापडला. त्यानंतर मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. इंफाळच्या खोऱ्यात आमदार आणि मंत्र्यांच्या घरांवर हल्ला करण्यात आला. मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आहे. यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘एक हा तो सेफ है’ नारा दिला होता. त्यावरूनच संजय राऊतांनी मोदींवर हल्लाबोल केलाय. आधी मणिपूर ‘सेफ’ करा!, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊतांनी मोदींवर निशाणा साधलाय.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
मणिपूरमधील वांशिक हिंसेचा वणवा नवनवीन भागांत पसरत आहे. देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. पंतप्रधान ‘एक है तो सेफ है’ अशा गैरलागू घोषणा देत फिरत आहेत. मोदीसाहेब, महाराष्ट्र आणि झारखंडच नव्हे, तर हा संपूर्ण देशच ‘एक’ आहे आणि ‘सेफ’देखील. तुम्हीच त्याची जातीय धार्मिक फाळणी करून तो ‘अनसेफ’ करीत आहात. मणिपूरसारखे संवेदनशील सीमावर्ती राज्यदेखील आज वांशिक भेद आणि त्यातून उफाळणाऱया हिंसाचाराने असुरक्षित बनले आहे ते तुमच्याच राजवटीमुळे. आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग महाराष्ट्र-झारखंडमध्ये धार्मिक ऐक्याचे नक्राश्रू ढाळा!

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

मणिपूरमधील सहा पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात’आफस्पा’ कायदा लागू करण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे. सध्या ज्या जिरीबाम जिह्यात हिंसेचा आगडोंब उसळला आहे तेथेही हा कायदा लागू असेल. मणिपूरमधून ‘आफस्पा’ काढून घेतला, असे मोठय़ा तोंडाने सांगणाऱया केंद्रीय सरकारवर तो पुन्हा लागू करण्याची वेळ का आली? मणिपूरमधील हिंसाचाराने आतापर्यंत 250 पेक्षा जास्त निरपराध्यांचे बळी घेतले आहेत. 7 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या फक्त दहा दिवसांत तेथे 17 जण मृत्युमुखी पडले आहेत. मणिपूरमधील वांशिक हिंसेचा वणवा नवनवीन भागांत पसरत आहे.