राज्याची विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच लोकपोलच्या सर्व्हेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण या सर्व्हेच्या माध्यमातून महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांना किती जागांवर विजय मिळेल, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोणत्या आघाडीला 288 पैकी 145 जागांचा बहुमताचा आकडा गाठता येईल, याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत. अशातच लोकपोलच्या सर्व्हेनुसार, महायुतीला 115 ते 128 जागांवर विजय मिळवता येईल. तर महाविकास आघाडीला 151-162 जागा मिळतील. इतर पक्षांना 5 ते 14 जागांवर बाजी मारता येईल, अशी शक्यता या सर्व्हेत वर्तवण्यात आली आहे.






विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला पाच दिवसाचा कालावधी उरला आहे. प्रचार आता शेवटच्या टप्प्यात रंगतदार आला आहे. निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने मोठी ताकद लावल्याने चुरस वाढली असून आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी अवघ्या काही दिवसाचा अवधी शिल्लक असल्याने कोण बाजी मारणार ? याची उत्सुकता लागली असतानाच लोकपोलचा सर्व्हे आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीची धाकधूक वाढली आहे.
लोकपोलच्या या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीप्रमाणेच काँग्रेसला घवघवीत यश मिळेल, असा अंदाज आहे. राज्यात येत्या काळात काँग्रेस पक्ष भाजपला पर्याय म्हणून समोर येईल, असे लोकपोलच्या सर्व्हेतून अंदाज वर्तविण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार महायुतीला 115 ते 128 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 151 ते 162 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी बहुमताचा आकडा पार करणार असल्याने येत्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीत महायुतीला 37 ते 40 टक्के, तर महाविकास आघाडीला 43 ते 46 टक्के मते मिळू शकतात, असा सर्व्हेचा अंदाज आहे. राज्यातील मतदार ध्रुवीकरणाचे प्रयत्न उधळून लावत दैनंदिन आयुष्याशी निगडीत मुद्द्यांवरुन मतदान करतील, असा लोकपोलचा सर्व्हे सांगतो. मताचे ध्रुवीकरण होणार नसल्याने या निवडणुकीत त्याचा आघाडीला फायदा होणार आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, एमआयएमसारख्या पक्षांना फारशी चमक दाखवता येणार नाही. पण महायुती आणि मविआसमोर बंडखोरांचे मोठे आव्हान असेल, असा अंदाज आहे.
राज्यात भाजपविरोधी वातावरण आहे. मतदार अनेक प्रश्नांसाठी, समस्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार मानतात. तर महायुतीमधील सर्वाधिक लोकप्रिय चेहरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे निष्कर्ष लोकपोलच्या सर्व्हेतून समोर आले आहेत. राज्यातील मतदार मतांच्या ध्रुवीकरणास फारसा प्रतिसाद न देता शेती, रोजगार, महिला सुरक्षा आणि महागाई या मुद्द्यांचा विचार करुन मतदान करेल, अशी माहिती सर्व्हेतून पुढे आली आहे. महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे युतीचे काही मतदार त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार महायुतीसाठी अडचणीचे ठरु शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागणार आहे. विशेषतः ठाकरेसेनेला काँग्रेसच्या व्होट बँकवर अवलंबून राहावे लागणार असल्याचे सर्व्हे सांगतो.











