शरद पवार गटाकडून माढा, पंढरपूर आणि मोहोळच्या सस्पेन्सवर पडदा, आणखी 5 उमेदवारांची घोषणा

0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पाचवी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाने नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत शरद पवारांकडून माढा, पंढरपूर आणि मोहोळमधील सस्पेन्सवर अखेर पडदा टाकला आहे. शरद पवारांनी माढा मतदारसंघातून अभिजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय बाबा कोकाटे, अॅड. मिनल साठे हे इच्छुक होते. पण शरद पवारांनी अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

शरद पवार गटाची यादी
अभिजीत पाटील – माढा

संगीता वाजे – मुलुंड

गिरीश कराळे – मोर्शी

अनिल सावंत – पंढरपूर

राजू खरे – मोहोळ

पंढरपुरातून महाविकासाघाडीकडून दोन उमेदवार रिंगणात
तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून महाविकासाआघाडीचे दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून यापूर्वीच काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवारांनी नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते अकलूज येथे अनिल सावंत यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

चौरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार?
यामुळे पंढरपूर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे, मनसेकडून दिलीप धोत्रे, काँग्रेसकडून भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत हे पंढरपूरच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या चौरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार गटाचे 88 उमेदवार रिंगणात
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत 88 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यातील पहिल्या यादीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांची नावाची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीत 22, तिसऱ्या यादीत 9, चौथ्या यादीत 7 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता पाचव्या यादीत शरद पवारांकडून 5 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या उमेदवारामध्ये माढा मतदारसंघातून अभिजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पंढरपूर-मंगळवेढा मतदारंसघातून अनिल सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन