महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही दिवसेंदिवस चुरशीची होत चालली आहे. आज विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल शेवटचा दिवस आहे. त्यातच आता मनसेकडून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता मातोश्रीच्या अंगणात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटातून वरुण सरदेसाई यांना तिकीट देण्यात आले आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी हे रिंगणात उतरले आहेत. त्यातच आता मनसेकडून तृप्ती सावंतांना तिकीट देण्यात आल्याने आता या ठिकाणी हायव्होलटेज लढाई पाहायला मिळणार आहे.






वांद्रे विधानसभा मतदारसंघात काटें की टक्कर
गेल्या काही दिवसांपासून वांद्रे विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. वांद्रे विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांचे तिकीट कापण्यात आले होते. झिशान सिद्दीकी यांनी निवडणुकीपूर्वी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना वांद्र्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यामुळे वांद्रे विधानसभा मतदारसंघातील काटें की टक्कर पाहायला मिळणार असल्याचे बोललं जात होतं. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोठी खेळी केली आहे.
तृप्ती सावंतांना मनसेकडून एबी फॉर्म
राज ठाकरेंनी मनसेच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा आणि माजी आमदार तृप्ती सावंत यांनी मनसेत प्रवेश केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे मनसेत प्रवेश करताच तृप्ती सावंत यांना विधानसभेची लॉटरी लागली आहे. तृप्ती सावंत यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी जाहीर झाली. तृप्ती सावंत या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांना मनसेकडून एबी फॉर्मही देण्यात आला आहे.
वांद्रे पूर्व मतदारसंघाचा इतिहास
तृप्ती सावंत या शिवसेनेचे माजी दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा. तृप्ती सावंत यांनी 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे शिवसेनेला फटका बसला होता. शिवसेनेचे वांद्रे पूर्वचे उमेदवार दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव होऊन झिशान सिद्धिकी आमदार झाले होते. शिवसेना ठाकरे गटाचा 2019 मध्ये हा पराभव मातोश्रीच्या अंगणातला असल्याने फार जिव्हारी लागला होता. त्यानंतर तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता.
वांद्रे पूर्व मतदारसंघातील 2015 ची पोटनिवडणूक गाजली होती. शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार बाळा सावंत यांचं निधन झालं होतं. त्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. त्यावेळी शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती. 2015 च्या निवडणुकीत तृप्ती सावंत यांच्याविरोधात काँग्रेसकडून नारायण राणे रिंगणात उतरले. थेट मातोश्रीला चॅलेंज देण्यासाठी नारायण राणे यांनी शड्डू ठोकला होता. आधी एकतर्फी वाटणारी आणि सहानुभूतीच्या लाटेवर असणारी ही निवडणूक, चांगलीच चुरशीची झाली होती.
मातोश्रीच्या अंगणात नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलं होतं. या निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी जवळपास 20 हजारांच्या फरकाने नारायण राणेंचा पराभव केला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी जल्लोष करताना हद्द पार केली होती. अनेक शिवसैनिकांनी हातात कोंबड्या घेऊन राणेंविरोधात घोषणा दिल्या होत्या. काही वर्षांपूर्वी याच पराभवावरून अजित पवार यांनी देखील नारायण राणेंची खिल्ली उडवली होती. बाईनं पाडलं बाईन अशा शब्दात अजित दादांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली होती.
‘मातोश्री’च्या अंगणात तिरंगी लढत
मात्र आता तृप्ती सावंत यांना मनसेकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यापूर्वी त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. यामुळे आता वांद्रे पूर्व मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. वांद्र्यात मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि अजित पवार गट यांच्या लढत होणार आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.











