काँग्रेसमध्येच मोठा दगाफटका झाला, नामुष्की थोडक्यात टळली; …तर सातवही दुसऱ्या फेरीत गेल्या असत्या!

0
11

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधान परिषदेत महायुतीनं आपले सगळे उमेदवार निवडून आणले. महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे तीनपैकी दोन उमेदवारांना विजय मिळवता आला. शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर लढणाऱ्या शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकूण १० मतं फुटली. त्यामुळे महायुतीचा विजय सुकर झाला.

महाविकास आघाडीकडे एकूण ६९ मतं होती. काँग्रेसकडे ३७, ठाकरेसेनेकडे १५, शरद पवार गटाकडे १२, शेकापकडे १, समाजवादी पक्षाकडे २, माकपकडे १ आणि अपक्षाकडे १ मत होतं. पण मविआच्या तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५९ मतंच मिळाली. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना २५, ठाकरेसेनेच्या मिलिंद नार्वेकरांना २२, तर जयंत पाटलांना १२ मतं मिळाली. याचा अर्थ महाविकास आघाडीची १० मतं फुटली. त्यात सर्वाधिक मतं काँग्रेसची असल्याचा अंदाज आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसनं दगाफटका होण्याची भीती ओळखून सातव यांच्यासाठी २८ मतांचा कोटा ठेवला होता. विजयासाठी २३ मतांचा कोटा असताना काँग्रेसनं सातव यांच्यासाठी अधिकची ५ मतं ठेवली होती. काँग्रेसचे एकूण ३७ आमदार आहेत. पैकी २८ जणांना सातव यांना पहिल्या पसंतीचं मत देण्याच्या सूचना होत्या. पण २८ पैकी ३ आमदारांनी सातव यांना मतदान केलं नाही. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलं. काँग्रेसची आणखी ३ मतं फुटली असती, तर पक्षावर मोठी नामुष्की ओढवली असती. कारण सातव यांना २३ मतं मिळाली नसती, तर त्या दुसऱ्या फेरीत गेल्या असत्या. पक्षाकडे ३७ मतं असूनही सातव दुसऱ्या क्रमांकावर गेल्या असत्या, तर काँग्रेससाठी अवघड परिस्थिती निर्माण झाली असती.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

काँग्रेसचे तीन ते चार आमदार क्रॉस व्होटिंग करतील, असं काँग्रेसचेच आमदार कैलास गोरंट्याल मतदानाच्या एक दिवस आधीच म्हणाले होते. त्यांनी या आमदारांची नावं घेतली नव्हती. पण एकाचा बाप, एकीचा नवरा, एक टोपी घालणारा, एक नांदेडवाला असं म्हणत त्या आमदारांचं वर्णन केलं होतं. त्यावरुन हे आमदार कोण आहेत याचा अंदाज बांधला गेला. या आमदारांचे अजित पवारांशी असलेले संबंध पाहता त्यांनी दादा गटाच्या उमेदवारांना मतदान केल्याची चर्चा आहे.

शरद पवार गट आपली १२ मतं शेकापच्या जयंत पाटील यांना देणार होता. पाटील यांच्या पक्षाचा एक आमदार विधानसभेत आहे. त्यामुळे त्याचं मतदान धरुन पाटील यांना पहिल्या पसंतीची किमान १३ मतं मिळायला हवी होती. पण पाटील यांना १२ मतंच मिळाली. त्यामुळे शरद पवार गटाचं १ मत फुटलं असल्याची चर्चा आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य