महायुती सरकारमधील शिवसेना शिंदे पक्षाचे सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजेवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निविदेसाठी कमिशन दे नाहीतर ती मागे घे, असं काळजेने ठेकेदाराला धमकविल्याचा आरोप करण्यात आला आहे. काळजेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे.
त्यानुसार सोलापूर सदर बझार पोलिस ठाण्यात शिवसेना जिल्हाप्रमुख काळजेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ठेकेदार आकाश कानडे (रा. बार्शी रोड, मानेगाव, वैराग, ता. बार्शी) याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. 1 जुलैला मनीष काळजे याच्या सात रस्ता परिसरातील संपर्क कार्यालयात आणि 2 जुलैला महापालिकेचे सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या कार्यालयात ही घटना घडल्याचं पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.
फिर्यादीत काय म्हटलं?
जिल्हाप्रमुख काळजेने अभियंता रामचंद्र कुंभार यांच्या माध्यमातून ठेकेदार कानडेला 1 जुलैला सात रस्ता येथील संपर्क कार्यालयात बोलावून घेतलं. अक्कलकोट रोडवरील ड्रेनेज कामाची निविदा मागे घे किंवा वर्क ऑर्डर 76 लाखांची आहे. त्यातून 15 टक्क्यांप्रमाणे 11 लाखांच्या मलईची मागणी काळजेने कानडेकडे केली.
कानडेने नकार दिल्यानं काळजेकडून दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आली. त्यासह अधिकाऱ्यांना सांगून अपात्र ठरविण्याची धमकी दिली. यानंतर कानडे 2 जुलैला दुपारी बाराच्या सुमारास महापालिकेचे कनिष्ठ अभियंता दिपक कुंभार यांच्यासमवेत सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या कार्यालयात निविदेच्या चौकशीसाठी गेले होते.
यावेळी जिल्हाप्रमुख काळजेसोबत असणारा राजेंद्र कांबळे हा त्याठिकाणी उपस्थित होता. त्यानं काळजेला फोन करून कानडे तिथे असल्याची माहिती दिली. नंतर काही वेळात जिल्हाप्रमुख काळजे आणि त्याचा चालक तेथे आला. त्यानं राग मनात धरून दोन्ही हातानं कानडेच्या तोंडावर मारलं.
तेव्हा, अभियंता दिपक कुंभार यांनी मध्यस्थी करत, ‘माझ्या कार्यालयात असे काही करू नका,’ म्हणून बाजूला केलं. त्यावेळी तू निविदा काढून घे किंवा मला दे. नाहीतर तुला सोलापुरात राहून देणार नसल्याची धमकी जिल्हाप्रमुख काळजेकडून कानडेला देण्यात आली. पण, नकार दिल्यानं पुन्हा जिल्हाप्रमुख काळजेनं आणि चालकानं शिवीगाळ करत हातानं आणि लाथाबुक्क्यांनी कानडेला मारहाण केली.