जालना: लोकसभा निवडणुकांमध्ये यंदा मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे फॅक्टर अतिशय महत्वाचा ठरला आहे. मराठवाड्यातील राजकारणाचं चित्रच बदलण्याचं काम मराठा आरक्षण आंदोलनानंतर झाल्याचं दिसून येत आहे. मराठवाड्यातील 8 पैकी 7 खासदार मराठा समाजाचे विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, बीड आणि जालना मतदारसंघातील विजय राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. विजयी झालेले काही खासदार मनोज जरांगेंची भेट घेऊन आभार मानत आहेत. त्यातच, आज अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तसेच, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा शब्दही त्यांनी जरांगेंना दिला. त्यामुळे, पाटील यांच्या या भेटीची चर्चा जोर धरत आहे.






लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडेंचा पराभव करुन विजय मिळवला. तर, अंतरवाली सराटी गाव ज्या जिल्ह्यात येतं त्या जालना मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र, वस्तुस्थिती तीच आहे, की मनोज जरांगे इम्पॅक्ट यंदाच्या निवडणुकीत दिसून आला आहे. स्वत: परभणी आणि बीडमधील महाविकास आघाडीच्या उमेवारांनी मनोज जरांगेंमुळेच आपला विजय झाल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांची चर्चा आत्ताच सुरू झाली आहे.
जालन्यातील अंतरवली सराटी येथे अजित पवार गटाचे अहमदपूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. 50 गाड्यांच्या ताफ्यासह शेकडो कार्कर्त्यांना घेऊन ते अंतरवाली सराटी येथे दाखल झाले होते. यावेळी, आमदार बाबासाहेब पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला, तसेच आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी भावनाही आमदार पाटील यांनी बोलून दाखवली. त्यामुळे, जरांगे यांच्या भेटीचा नेमका उद्देश काय, नेतेमंडळी जरांगेंच्या भेटीसाठी का येत आहेत, याची चर्चा मराठवाड्यात रंगली आहे. मात्र, मराठवाड्यातील काही मराठा खासदारांच्या विजयात जरांगे फॅक्टरचा महत्त्वाचा वाटा असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, अंतरवाली सराटी जरांगे यांच्या भेटीसाठी आलेल्या मुस्लिम बांधवांकडून ही जरांगे पाटील यांचा शाल टोपी घालून सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रात 26 मराठा खासदार
महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतून खासदार म्हणून सर्वाधिक वाटा मराठा समाजाला मिळाला आहे का? राज्यातील निवडून आलेल्या 48 खासदारांची यादी तपासली तर त्यामध्ये तब्बल 26 मराठा खासदारांचा समावेश आहे. तर फक्त 9 खासदार हे ओबीसी समाजातील आहेत. 6 खासदार अनुसूचित जातीचे, 4 खासदार अनुसूचित जमातींचे, तर 3 खासदार खुल्या वर्गातील असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील गेल्या काही महिन्यातील राजकीय वातावरण, मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन, आणि त्यामुळे झालेला मराठा मतांचा ध्रुवीकरण याचा हा परिणाम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात निवडून आलेल्या जातनिहाय खासदारांची यादी…
मराठा खासदार महाविकास आघाडी
शाहू छत्रपती, डॉ. शोभा बच्छाव, विशाल पाटील,
सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते, संजय देशमुख,
अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, निलेश लंके,
ओमप्रकाश निंबाळकर, डॉ कल्याण काळे,
वसंत चव्हाण, नागेश आष्टीकर, संजय जाधव,
बजरंग सोनवणे
मराठा खासदार महायुती
स्मिता वाघ, नारायण राणे, श्रीकांत शिंदे,
उदयनराजे भोसले, नरेश म्हस्के, मुरलीधर मोहोळ,
श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, प्रतापराव जाधव,
संदिपान भुमरे, अनुप धोत्रे
ओबीसी खासदार महाविकास आघाडी
प्रतिभा धानोरकर, डॉ. अमोल कोल्हे, डॉ. प्रशांत पडोळे, अमर काळे, संजय दिना पाटील, सुरेश बाळ्या मामा म्हात्रे
ओबीसी खासदार महायुती
रक्षा खडसे, सुनील तटकरे, रवींद्र वायकर
एससी (SC) खासदार
बळवंत वानखेडे, भाऊसाहेब वाकचौरे, प्रणिती शिंदे,
वर्षा गायकवाड, श्यामकुमार बर्वे, डॉ शिवाजी काळगे
एसटी (ST) खासदार
भास्कर भगरे, डॉ. हेमंत सावरा, डॉ. नामदेव कीरसान, गोपाल पाडवी
खुल्या वर्गातील खासदार
नितीन गडकरी, पियुष गोयल, अनिल देसाई










