देशात कोणाचे सरकार बनणार? याचा निर्णय अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. 4 जून रोजी सकाळी 9 वाजल्यापासून लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरवात होईल. त्याआधी 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान संपले आणि एक्झिट पोलचे निकाल हाती आले. या एक्झिट पोलमधून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला 350 हून अधिक जागा मिळून बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, इंडिया आघाडीला 150 ते १७० जागा मिळतील असे एक्झिट पोल सांगत आहे. त्याचप्रमाणे काही राज्यात कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीला शून्य जागा मिळतील असेही या एक्झिट पोलमधून समोर आले होते. मात्र, त्या सर्व एक्झिट पोलनंतर आता भाजपला धक्का देणारा आणखी एक एक्झिट पोल समोर आला आहे. देशातील हा पहिला AI एक्झिट पोल आहे.






1 जून रोजी जाहीर झालेल्या अनेक एक्झिट पोलमध्ये भाजपला देशात सरकार स्थापन करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पराभवासह भाजपला आघाडी मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, नव्या एक्झिट पोलमध्ये दिल्लीत धक्कादायक निकालाचा दावा करण्यात आला आहे. आम आदमी पार्टी, काँग्रेस आघाडी आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होत आहे. नव्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत इंडिया आघाडीला सातपैकी पाच जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एका वृत्तवाहिनीने देशातला हा पहिला AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) एक्झिट पोल सर्व्हे केला आहे. प्रायोगिक तत्वावर हा एक्झिट पोल दिल्लीच्या सात जागांवर घेण्यात आला. त्या चॅनलने अशा प्रकारचा हा पहिलाच एक्झिट पोल असल्याचा दावा केला आहे. तसेच, याचे निकाल आधी आलेल्या सर्व एक्झिट पोलपेक्षा खूप वेगळे आहेत. दिल्लीत भाजप 2 ते 4 जागा जिंकू शकते, असे पोलमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर इंडिया अलायन्सला 3 ते 5 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. AI एक्झिट पोलचा हा निकाल योग्य ठरला तर भाजपसाठी हा मोठा धक्का असेल.
2019 आणि 2014 मध्ये भाजपने दिल्ली लोकसभेच्या सातही जागा जिंकल्या होत्या. भाजपला टक्कर देण्यासाठी आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच काँग्रेससोबत निवडणूकपूर्व युती केली. आम आदमी पक्षाने चार तर काँग्रेसने तीन जागा लढवल्या होत्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्यात अटक झाली. मात्र, कोर्टाने त्यांना 21 दिवसांचा जामीन दिला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत अतिशय रंजक लढत पाहायला मिळाली. 2 जून रोजी आत्मसमर्पण करण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील आणि निकाल त्यांच्या बाजूने लागेल असा दावा केला होता.
इतर सर्वेक्षणातील अंदाज काय आहेत?
इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाचा अंदाज आहे की दिल्लीत भाजपला 6 ते 7 जागा मिळू शकतात. AAP – काँग्रेस आघाडीला 1 जागा मिळेल. इंडिया टीव्हीचाही साधारण असाच अंदाज आहे. न्यूज 18 च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 5 तर आप – काँग्रेसला 02 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. न्यूज 24 टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 6 जागा आणि इंडिया अलायन्सला एक जागा मिळण्याची अपेक्षा आहे.













