पुण्यातील हायप्रोफाईल अपघात प्रकरणात स्वत: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले असून यातील आरोपी किंवा तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही, अशा शब्दात फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली. मात्र, याप्रकरणी राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. तसेच, विधीसंघर्ष बालक, त्याचे वडिल, संबंधित आरटीओ अधिकारी यांच्यासह इतर संबंधितांवरही कारवाईची मागणी अंबादास दानवेंनी केली आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून पुणे अपघातावर भाष्य केलं. त्यावरुन, आता देवेंद्र फडणवीसांनी संताप व्यक्त केला आहे. तर, याप्रकरणात मोठ्या स्तरावर राजकारण होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.






पुणे पोर्शे कार अपघातात अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे भरधाव वेगाने कार चालवत दोघांचा जीव घेतला. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. बड्या बापाचा बिघडेल लेक दोन जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रया उमटल्या. तर, याप्रकरणी एका आमदाराने पोलीस स्टेशन गाठून प्रकरणावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यावरुनही राजकारण तापलं आहे. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत काल पुणे पोलीस आयुक्तालयात भेट देऊन सर्व घटनेची इतंभू माहिती घेतली. त्यानंतर, आज ते राजधानी दिल्लीत प्रचारासाठी पोहोचले आहेत. यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुण्यातील घटनेबाबत दिल्लीतून भाष्य केलं.
काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुण्यातील घटनेवरुन संताप व्यक्त करत, गरीब आणि श्रीमंतांच्या मुलांसाठी एकच न्याय असावा, अशी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचाही उल्लेख केला होता. आता, राहुल गांधींच्या प्रतिक्रियेनंतर देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीतून पलटवार केला आहे. याप्रकरणी मोठ्या स्तरावर राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. कारण, पुण्यातील घटनेवर पोलिसांनी त्वरीत कारवाई केली आहे. बाल हक्क मंडळाने जो निर्णय दिला, त्यावर आम्हीही आश्चर्य व्यक्त केलं असून पोलिसांनी पुन्हा अर्ज दाखल केला आहे. ज्यांनी अल्पवयीन मुलास दारु दिली, त्यांना अटक करण्यात आली आहे. तर, ज्या वडिलांनी अल्पवयीन मुलास गाडी दिली, त्यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
मतांचं राजकारण करण्याचा प्रयत्न
पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जाईल. पण, प्रत्येक गोष्टीत मतांचं राजकारण करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत, ते चुकीचं आहे. त्यांनी या घटनेचं जे राजकारण केलंय त्याचा मी निषेध करतो, असे फडणवीसांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी
दरम्यान, पुण्यातील घटनेवर राहुल गांधींनी प्रतिक्रया दिली होती. बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर , ओला, उबेर ड्रायव्हर, ऑटो ड्रायव्हर यांच्याकडून जर काही चूक झाली आणि अपघातात कुणाचा चुकून मृत्यू झालाच तर त्यांना दहा वर्षांची शिक्षा ठोठावली जाते. त्याचसोबत त्यांच्याकडून चावी घेऊन ती फेकली जाते.पण जर श्रीमंत घरातील 16-17 वर्षांचा मुलगा जर दारू पिऊन दोन लोकांची हत्या करतो, तर त्याला सांगितलं जातंय की अपघातावर निबंध लिहा, असं करा, तसं करा. त्या श्रीमंत मुलाला ज्या पद्धतीने शिक्षा म्हणून निबंध लिहायला लावला जातोय, तशा पद्धतीने त्या बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हरकडून का लिहून घेतलं जात नाही. देशात सध्या दोन भारत बनले आहेत, एक श्रीमंतांचा आणि एक गरिबांचा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारल्यानंतर ते म्हणतात की, मी सर्वांनाच गरीब बनवू का? पण प्रश्न हा नाही, प्रश्न आहे तो न्यायाचा. गरिबाला एक न्याय आणि श्रीमंतांना एक न्याय असं का? न्याय हा सर्वांनाच सारखा मिळाला पाहिजे. मग तो गरीब असो वा श्रीमंत, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली होती.











