सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूर येथे जात असते. यंदाही पालखी 13 जून रोजी शेगाव येथून पंढरपूरसाठी प्रस्थान करणार आहे याचा सर्व नियोजनाची तयारी आता संत गजानन महाराज संस्थान करत आहे यंदा दिंडीचे हे 55 वर्षे असून जवळपास सातशे वारकऱ्यांसह राज वैभवी थाटात या दिंडीचं 13 जून रोजी प्रस्थान होणार आहे या दिंडीत 700 वारकरी , 250 पताकाधारी 250 टाळकरी 200 सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी 13 जून रोजी प्रस्थान होणार आहे . तर पुढील एक महिना पायी प्रवास करून 15 जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहे.






यंदा आषाढी एकादशी 17 जुलैला आहे. या दिवशी समस्त वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमतो. त्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येतात. आषाढी एकादशीसाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदाच्या आषाढी वारीसाठी 29 जूनला प्रस्थान होणार आहे. पंढरपुरात चार दिवसांच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपवून संत ज्ञानेश्वरांची पालखी 21 जुलैला परतीच्या प्रवासाला निघेल.
ज्ञानोबांच्या पालखीचा यंदाच्या आषाढी वारीचा कार्यक्रम कसा असेल?
आषाढी एकादशी यंदा 17 जुलै दिवशी आहे. त्यासाठी संत ज्ञानेश्वरांची पालखी 29 जूनला पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरु करेल. यंदा या पालखी सोहळ्याचं 339 वं वर्ष आहे. माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आळंदीमधील गांधी वाड्यातील दर्शनबारी मंडपामध्ये होणार आहे. पुण्यात 30 जून आणि 1 जुलै तर सासवड मध्ये 2, 3 जुलैला मुक्काम असणार आहे. त्यानंतर अडीच दिवस ज्ञानोबांची पालखीचा मुक्काम हा लोणंदमध्ये असणार आहे. माऊलींची पालखी आषाढी एकादशीपूर्वी 16 जुलैला पंढरपूरला पोहचणार आहे.
पालखी सोहळ्यासाठी यंदा विशेष व्यवस्था
यंदाच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्याचे नियोजन सुरु आहे. पालखीला टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व स्रोतांची तपासणी करावी. आवश्यक ती निर्जंतुकीकरणाची औषधे, दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पाणीपुरवठ्याचे टँकर आणि शौचालयांच्या संख्येत वाढ कण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास ती तात्काळ काढून टाकण्यात यावीत. आपत्कालीन व्यवस्थेसाठी नगरपालिकेकडील लायटिंग टॉवरचा उपयोग पालखी दरम्यान करण्यात यावा, असे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.











