काय चाललंय कल्याणमध्ये? आधी उमेदवारी चोरली, आता कार्यकर्त्यांकडून मारहाण

0
1

महाराष्ट्रात आता लोकसभा निवडणुकीचं शेवटचं पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे ला होणार आहे. राज्यातील एकूण 13 जागांसाठी या दिवशी मतदान होणार आहे. या मतदारसंघांमध्ये कल्याण मतदारसंघाचा देखील समावेश आहे. याच कल्याण मतदारसंघात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात अतिशय अमानुषपणे मारहाण केली आहे. यावेळी मारहाण करणाऱ्यांनी वंचितच्या पदाधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देखील केली आहे. पीडित पदाधिकारी आपण काहीच केलं नसून स्वत:ला सोडवण्यासाठी विनवणी करत होता. तसेच आपण मंत्रालयात कामाला असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काम केलं असल्याचं पीडित पदाधिकारी सांगत होता. पण कार्यकर्त्यांनी या पदाधिकाऱ्याला त्याचे कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रकाश आंबेडकर संबंधित व्हिडीओची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

नेमकं प्रकरण काय?
कल्याणमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पक्षाची दिशाभूल केल्याच्या गैरसमजातून वंचितच्या कार्यकर्त्याने ही मारहाण केली आहे. वंचितच्या कार्यकर्त्याने पदाधिकारी मिलिंद कांबळे यांना मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील रोनक सिटीमध्ये राहणारे वंचितचे पदाधिकारी मिलिंद कांबळे यांना वंचितने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देत एबी फॉर्म दिला होता. हा फॉर्म देण्याची जबाबदारी एका व्यक्तीला देण्यात आली. त्याचे नाव देखील मिलिंद कांबळे होते. मात्र नावात साम्य असल्याचा फायदा घेत मिलिंद कांबळे याने फॉर्म चोरून अर्ज दाखल केला. या प्रकरणी एबी फॉर्म चोरून फॉर्म भरणाऱ्या मिलिंद कांबळे विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

याप्रकरणी भिवंडी पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र वंचितच्या कार्यकर्त्याने काल कल्याण रोनक सिटीमध्ये राहणाऱ्या मिलिंद कांबळे यांना गाठत जाब विचारला. त्यावेळी मिलिंद कांबळे यांनी आपल्यासोबत कशी फसवणूक झाल्याचे सांगितलं. मिलिंद कांबळे यांनी नाव सारखे असणाऱ्या व्यक्तीने कसे फसवले, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, वंचितच्या कार्यकर्त्याने तुम्ही देखील सहभागी आहात, असे सांगत त्यांना मारहाण केली. या कार्यकर्त्याने अक्षरशः भररस्त्यात कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. याप्रकरणी कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही. मात्र संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती