कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. खास करून राधानगरी तालुका यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघात आगामी राजकीय गणित डोळ्यांसमोर ठेवून अनेकांनी राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची अधिक चर्चा रंगत असताना दिसत आहे.






राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले ए. वाय. पाटील यांनी महायुतीच्या विरोधात जात काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यासह अजित पवार यांना धक्का देत त्यांनी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थिती लावून आगामी राजकीय भवितव्याचे संकेत दिले आहेत.
दहा महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी महायुतीला पाठिंबा दिला. त्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यात उमटले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून हसन मुश्रीफ, ए. वाय. पाटील यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार के. पी. पाटील यांनी बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत अजित पवारांना पाठिंबा दिला. पण, याच कारखान्याच्या निवडणुकीत के. पी. पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याविरोधात जात ए. वाय. पाटील यांनी आबिटकर गटाला साथ दिली.
नंतर राधानगरी तालुक्यात ए. वाय. पाटील यांनी दोन हात लांब राहत हसन मुश्रीफांवर फटकारे ओढत लोकसभेला महायुतीच्या विरोधात जात काँग्रेसला पाठिंबा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीचं राजकीय चित्र डोळ्यासमोर ठेवत आमदार प्रकाश आबिटकर यांची शिवसेना आणि माजी आमदार के. पी. पाटील यांची अजितदादांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी निश्चित समजली जात असताना आपली अडचण होऊ नये, यासाठी ए. वाय. पाटील पाऊल उचलताना दिसत आहेत.
यातच राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापुरात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला हजेरी लावत ए. वाय. पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावरून मनोमिलन झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे ए. वाय. पाटील बॅक टू पॅव्हेलियन करणार असल्याची चर्चा रंगली आहे.











