नाशकात भुजबळांनी दावा सोडला तरी तिढा वाढलेलाच; ‘ती’ भीती खरी ठरणार? असाही भाजपचा आजही आग्रह

0

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान पूर्ण झालं आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचारसभा सुरू आहेत. पण महायुतीमधील जागावाटपाचा तिढा कायम आहे. अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवरील दावा सोडला आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी याबद्दलची घोषणा केली. मात्र यानंतरही नाशिकमधून उमेदवाराची घोषणा झालेली नाही. त्यामुळे भुजबळांच्या माघारीनंतरही नाशिकचा पेच कायम आहे.

भुजबळांनी दावा सोडल्यानं नाशिकचा विषय निकाली निघेल असं वाटत असताना या जागेवर भाजपनं पुन्हा एकदा दावा सांगितला आहे. नाशिकमध्ये पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी महिनादेखील राहिलेला नाही. भुजबळ यांचं नाव चर्चेत आल्यानं शिंदेसेना आणि भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. या पक्षाच्या नेत्यांच्या मुंबई आणि दिल्लीत चकरा वाढल्या. तिढा कायम राहिल्यानं छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. आपण उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याची घोषणा भुजबळांनी केली. भुजबळांनी दावा सोडून तीन दिवस होत आले आहेत. मात्र तरीही नाशिकचा उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

भुजबळांची भीती खरी ठरणार?
तीन आठवड्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या भेटीत केंद्रीय मंत्री अमित शहांनी नाशिकसाठी माझ्या नावाचा आग्रह धरला. नाशिकमध्ये शिंदेंच्या सेनेचा खासदार असल्यानं त्यांचे काही प्रश्न होते. त्यामुळे नाशिकच्या जागेवरुन बराच खल सुरू होता. यात तीन आठवडे गेले. दरम्यान महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केला. त्यांच्याकडून प्रचार सुरू झाला. आता उमेदवार निश्चित होण्यास अधिक वेळ लागल्यास नाशिकची जागा अडचणीत येईल. तसं होऊ नये म्हणून माघार घेत असल्याचं भुजबळ म्हणाले होते.

सेनेकडून कोण? गोडसे की बोरस्ते?
शिंदेसेनेकडून खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते यांची नावं चर्चेत आहेत. गोडसे यांच्याविरोधात वातावरण असल्याचं भाजपचे सर्व्हे सांगतात. त्यामुळे भाजप त्यांच्या नावाबद्दल अनुकूल नाही. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे ग्राऊंड रिपोर्ट घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे अजय बोरस्ते यांच्या नावाबद्दल भाजप अनुकूल असल्याचं बोललं जातं.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यात विद्यमान आमदाराचाही समावेश आहे. नाशिक, ठाण्यापैकी एक जागा आम्हाला द्या, असा भाजपचा आग्रह आहे. तर राष्ट्रवादीकडून निवृत्ती अरिगळे, माणिकराव कोकाटे यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. भुजबळ नसले तरीदेखील ही जागा अजित पवार गटालाच द्यावी, मागणी केली जात आहे.