धायरी येथील डीएसके विश्व रोडवरील एका फर्निचर तयार करणाऱ्या गोडाऊनला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग रात्री २:५० वाजता लागली असून, N.A.C. Enterprises या गोडाऊनमध्ये ही घटना घडली.
आगीची माहिती मिळताच नवले फायर स्टेशन, सिंहगड फायर स्टेशन, पीएमआरडीए फायर ब्रिगेड आणि सेंट्रल फायर स्टेशनमधील पाण्याचा टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आला.
फायर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, घटनास्थळी पोहोचल्यावर अग्निशमन दलाला मोठ्या प्रमाणात फर्निचर जळताना आढळले. गोडाऊनचे शटर बंद असल्यामुळे शटर फोडून आत प्रवेश करून अग्निशमन दलाने सतत पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत गोडाऊनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जळून खाक झालेल्या वस्तूंमध्ये फर्निचर, यंत्रसामग्री, दोन दुचाकी वाहने व पत्र्याचा शेड यांचा समावेश आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ही कारवाई फायर ऑफिसर उमरटकर आणि निलेश पोकळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्या सोबत भारत गोगावले, विशाल धायगुडे, हर्षद कांबळे, ऋषिकेश हुंबे, ईश्वर नारवडे, प्रतीक एडके आणि किशोर काळभोर हे जवान व कर्मचारी उपस्थित होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत अधिक तपास सुरू असून, हानीचे मूल्यांकन सध्या संबंधित विभाग करत आहेत.