डेंजरझोनमध्ये जागा आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातील नेतेमंडळींचा विरोध डावलून भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात रणजीतसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यांना होणारा विरोध दिवसागणिक वाढतच चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी नाराज नेतेमंडळींसोबत बैठक घेतल्यानंतरही माढा मतदारसंघातला वाद निवळलाच नाही. या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतर आता माढ्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.






माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर हे उत्सुक होते.मात्र,महायुतीत भाजपने ही जागा आपल्याकडेच ठेवत तिथे विद्यमान खासदार रणजीतसिंह निंबाळकरांनाच पुन्हा उमेदवारी दिली.यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली असून माढ्यात उमेदवार बदलण्याची मागणी केली.पण या जागेवरुन भाजप उमेदवारी मागे घेण्याची शक्यता फारच कमी आहे. त्याचमुळे माढ्यात महायुतीमध्ये बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी डावलल्यानंतर मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. विशेषतः धैर्यशील आणि जयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. मात्र,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे अजूनही भाजप सोडायला तयार नाहीत, त्यामुळे माढ्यातून तुतारीवर नेमकं लढणार, याची उत्सुकता आहे.काही दिवसांपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार एकत्र आले होते.त्यानंतर धैर्यशील यांच्या उमेदवारीबाबत स्पष्टता येऊ लागली होती.
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये माढ्याचा तिढा अद्याप कायम आहे. भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील नाराज आहेत, तर महादेव जानकरांनी पवारांची ऑफर नाकारत महायुतीसोबत गेल्याने महाविकास आघाडीचाही उमेदवार अद्याप ठरत नाही. नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी (ता. 3 ) ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर गुरुवारी (ता. 4 ) दुसऱ्या दिवशी सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख हेही पवारांना भेटले. त्यांनी डॉ. अनिकेत देशमुख यांना माढ्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे, त्यामुळे माढ्याबाबत पवारांच्या मनात नेमकं काय?, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रवीण गायकवाडही उत्सुक…
मोहिते पाटलांचा तुतारीचा निर्णय होत नसल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष तथा शरद पवारांचे विश्वासू प्रवीण गायकवाड यांनी मोहिते पाटलांनी तुतारीवर लढावे अथवा मी माढा लोकसभा लढण्यास तयार आहे, असे स्पष्ट केले आहे, त्यामुळे माढ्यात नवा ट्विस्ट आला आहे. माढ्याच्या उमेदवारीबाबत पवार आणि गायकवाड यांची रविवारी दिल्लीत बैठक होऊन सविस्तर चर्चाही झाली आहे.










