संसदेत महिला आरक्षण विधेयक संमत झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाने आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारात महिलांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली आहे. अद्याप काही जागांवर उमेदवार जाहीर होणे बाकी असल्याने महिलांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत महाविकास आघाडी व महायुतीमधील घटक पक्षाने 14 महिलांना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.
यावर्षीच्या निवडणुकीत 48 मतदारसंघातून 14 महिला उमेदवारांना विविध राजकीय पक्षांनी संधी दिली आहे. यामध्ये पक्षनिहाय आकडेवारी पहिली तर महायुतीमधील भाजपने सर्वाधिक सहा महिलांना संधी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दोघी जणांना तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एक महिला उमेदवार नशीब अजमावणार आहेत.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने दोन महिलांना संधी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांकडून एक तर उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून दोन महिलांना उमेदवारी देत विश्वास दर्शविला आहे. वंचित बहुजन आघाडीनेही एका महिलेला संधी दिली.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बारामतीमधून सुनेत्रा पवार तर धाराशिवमधून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली.
भाजपने बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, जळगावमधून स्मिता वाघ, दिंडोरीमधून केंद्रीय मंत्री भारती पवार, अमरावतीमधून नवनीत राणा यांना रिंगणात उतरवले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली.
काँग्रेसने सोलापूरमधून प्रणिती शिंदे, चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना संधी दिली. तर उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमधून भारती कामाडी यांना संधी दिली आहे. अमरावती मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने प्राजक्ता पिल्लेवान यांना रिंगणात उतरविले आहे.
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत महिला उमेदवारांचा टक्का वाढणार असून गेल्या दोन निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या अधिक असणार आहे. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षाकडून 8 महिलांना तर 2019च्या निवडणुकीत 12 महिलांना संधी मिळाली होती. अद्यापही पाच ते सहा मतदारसंघातील उमेदवार जाहीर होण्याची बाकी आहेत. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.