वंचित बहुजन आघाडीने या लोकसभा निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे. या पक्षाने आतापर्यंत एकूण 20 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी माढा या लोकसभा मतदारसंघासाठी रमेश बारसकर यांना तिकीट दिले आहे. ते मुळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते आहेत. दरम्यान, बारसकर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून विंचितमध्ये प्रवेश केला आहे. याच कारणामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने बारसकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.






बारसकर यांची पक्षातून हकालपट्टी
रमेश बारसकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी कार्यरत होते. मात्र वंचितने तिकीट दिल्यानंतर आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा निर्णय घेताना राष्ट्रवादीने वंचितचा किंवा वंचितच्या अन्य कोणत्याही नेत्याचा उल्लेख केलेला नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बारसकर यांचा संपर्क अलिकडच्या काळात वाढला होता. ही बाब लक्षात घेता, त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे, असं स्पष्टीकरण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दिलं आहे.
भुजबळ यांच्या संपर्कात असल्याचा दावा
ओबीसी नेते छगन भुजबळ आणि ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बारसकर यांचा संपर्क वाढल्याचा पक्षाकडून करण्यात आलां आरोप रमेश बारसकर हे आता वंचितच्या तिकिटावर माढ्यातून निवडणूक लढवणार आहेत. सुरुवातील त्यांनी राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. मात्र संधी मिळणार नाही, हे लक्षात येताच त्यांनी वंचितला जवळ केलं. बरसकर यांना तिकीट मिळाल्यामुळे आता माढ्यातील निवडणूक चुरशीची होणार आहे.
माढ्यात तिरंगी लढत होणार?
भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. माढा या मतदारसंघावर राष्ट्रवदीचे वर्चस्व होते. मात्र 2019 साली भाजपच्या तिकिटावर रणजितसिंह निंबाळकर यांनी विजय खेचून आणला होता. भाजपने यावेळीही त्यांच्यावरच विश्वास ठेवला आहे. महविकास आघाडीने मात्र अद्याप या ठिकाणी आपला उमेदवार दिलेला नाही. या मतदारसंघात धनरगर समाजाचे प्रमाण पाहता शरद पवार येथून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यासाठी उत्सुक होते. मात्र जानकर यांना महायुतीने तिकीट दिल्यामुळे या जागेसाठी नव्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, वंचितने येथून उमेदवार उभा केल्यामुळे महाविकास आघाडीला पटका बसू शकतो. येथे होणारे संभाव्य मतविभाजन हे भाजपच्या पथ्यावर पडू शकते.











