शिवसेना नेते, माजी आमदार विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात मोर्चा काढला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यापार्श्वभूमीवर विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली. या भेटीनंतरही शिवतारेंनी बारामती लोकसभा मतदारसंघातून लढण्यावर ठाम असून अजित पवारांना लक्ष्य करण्याचं सुरूच ठेवलं आहे.






‘युतीधर्म आपल्याला पाळायला हवा,’ असं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितल्याचं शिवतारेंनी म्हटलं. तसेच, मी बारामतीतून लढलो नाही, तरीही अजित पवार निवडून येणार नाहीत, अशी दर्पोक्ती शिवतारेंनी केली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
“महायुतीचा उमेदवार बारामतीत पराभूत होणार”
“अजित पवारांना विरोधी करण्याची कुणाची हिंमत नाही. सततची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता मोडण्याची जनतेची इच्छा आहे. त्यामुळे मी बारामतीतून उभे राहणं गरजेचं आहे. त्यातून चांगला निकाल येऊन शकतो. मी बारामतीतून लढलो नाही, तरी अजित पवार निवडून येणार नाहीत. महायुतीचा उमेदवार तिथे पराभूत होणार आहे. आपण याचा विचार करावा, असं मुख्यमंत्र्यांना मी म्हटलं. त्यावर ‘त्यांचं काय आपपासांत व्हायचं होऊद्या. ते ( अजित पवार ) त्यांच्या कर्मानं मरतील. आपण त्यांच्या पराभवाचे धनी नको व्हायला,'” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचा दावा शिवतारेंनी केला.
“लोकांची चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार”
“ही लढाई पवार विरुद्ध सामान्य जनता अशी आहे. हा एक ऐतिहासिक असा क्षण आहे. मला थांबवू नका, असं मुख्यमंत्र्यांना मी म्हटलं. पण, ‘युती धर्म पाळायला हवा,’ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे लोकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार,” अशी माहिती शिवतारेंनी दिली.
“राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी दंड थोपटले”
“आता अजित पवारांना माझा अवाका माहिती पडेल. मी छोटा माणूस आहे, मग अजित पवार मला का घाबरत आहेत. मग आता एवढं का तडफडत आहेत. मी राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी दंड थोपटले आहेत,” असंही शिवतारेंनी म्हटलं.










