कोथरूड : कोथरूड मधील गुजरात कॉलनी येथील श्री अष्टविनायक मित्र मंडळ (ट्रस्ट) व जय महाराष्ट्र महिला मंडळ यांच्या वतीने ‘कोजागिरी पौर्णिमा’ निमित्त महाभोंडला, रासदांडिया व गरबा चे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन कोजागिरी पौर्णिमा जल्लोषात साजरी केली.
‘ऐलोमा पैलवा गणेश देवा’, ‘एक लिंबू झेलो बाई’, ‘आड बाई अडाणी’ ‘खिरापतीला काय ग’, अशी विविध भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हणत महिलांनी फेर धरला. यानंतर महिला, मुली व तरुणांनी रास दांडिया व गरबाचा डी. जे. तालावर आनंद घेतला. यामध्ये गुजरात कॉलनी मधील तरुण मुलं-मुली, महिला उत्साहाने सहभागी झाले होते.
या नंतर गुजरात कॉलनीतील जवळपास 300 पेक्षा जास्त नागरिकांनी कोजागिरी निमित्त मसाला दूध चा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाची संकल्पना श्रीअष्टविनायक मित्र मंडळ (ट्रस्ट) ची होती व संयोजन जय महाराष्ट्र महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.