बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. बिग बी यांना आज (शुक्रवारी) सकाळी 6 वाजता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांची हार्टच्या समस्येमुळे नाही तर पायात क्लॉट झाल्यानं अँजिओप्लास्टी करण्यात आली, असं म्हटलं जात आहे.
बिग बींनी शेअर केलं ट्वीट
बिग बींनी नुकतेच एक ट्विट शेअर केले आहे, यामध्ये त्यांनी लिहिलं,”मी तुमचा सदैव आभारी आहे.” अँजिओप्लास्टीनंतर बिग बींनी हितचिंतकांचे आभार व्यक्त केले आहेत,असा अंदाज हे ट्वीट पाहिल्यानंतर लावला जात आहे.
केबीसीच्या शूटिंगदरम्यान झाली होती दुखापत
2022 मध्ये कौन बनेगा करोडपती-14 या शोच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. याबाबत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं.
अमिताभ बच्चन यांना दोन वेळा झाला कोरोना
अमिताभ यांनी 2020 मध्ये ट्विट करून माहिती दिली होती की त्यांना कोविडची लागण झाली आहे. त्यांचा मुलगा अभिषेकही पॉझिटिव्ह होता. बिग बी दोन महिने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते. नंतर 2022 मध्ये देखील अमिताभ यांनाही कोविडची लागण झाली.
अमिताभ बच्चन यांचे चित्रपट
अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.ते प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटातून बिग बी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसेच बिग बींचा ‘गणपत’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.