गेल्या काही दिवसांपासून मनसेला जय महाराष्ट्र करणार अशी चर्चा असतानाच पुण्यामधील मनसेचे मातब्बर नेते वसंत मोरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना दे धक्का करत पक्षालाच रामराम केला. त्यामुळे वसंत मोरे भविष्यामध्ये कोणता राजकीय निर्णय घेणार याची चर्चा आहे. दरम्यान वसंत मोरे यांच्यासाठी आता काँग्रेसने पहिल्यांदाच सूत्रं हलवताना त्यांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी काँग्रेसचे ऑफर घेऊन वसंत मोरे यांच्या भेटीला गेले आहेत. वसंत मोरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, त्यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षाला गरज आहे आणि त्यांना न्याय देखील दिला जाईल अशी भूमिका आपण माजी आमदार मोहन जोशी यांनी मांडली.
बाळासाहेब थोरात यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली जाणार
ते म्हणाले की, वसंत मोरे यांच्यासारखा कार्यकर्ता काँग्रेसमध्ये आल्यास काँग्रेसची मोठी ताकद वाढेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान मोहन जोशी काँग्रेसची ऑफर घेऊन गेल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे वसंत मोरे आता हे काँग्रेसचा पर्याय निवडणार का? याची चर्चा रंगली आहे दरम्यान पुण्यातील उमेदवारी कोणाला द्यायची, याचा पुरेपूर अधिकार वरिष्ठ नेत्यांना असून तेच त्या संदर्भातील निर्णय घेतील असेही त्यांनी नमूद केले. आता फक्त मी त्यांना काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी ऑफर देत असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडूनही प्रयत्न
दरम्यान, वसंत मोरे यांनी मनसेमधून राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्येही त्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत वाॅशिंग मशिनचा मार्ग निवडू नये, असा टोला लगावला आहे. दरम्यान, शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बारामती लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये वसंत मोरे यांनी उपस्थिती लावल्याने भूवया उंचावल्या होत्या. शरद पवारांशी त्यांची दोन मिनिटे चर्चा झाली होती. ही भेट सामाजिक कामासाठी असल्याचं वसंत मोरे यांनी जरी सांगितलं असलं तरी त्या दोन मिनिटांच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा झाली का? वसंत मोरे हे शरद पवरांसोबत जाणार का? असेही प्रश्न उपस्थित झाले आहेत.