मैत्रिणीला मॉडेलिंगसाठी नेल्यामुळे एकाने तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना सर परशुराम महाविद्यालयाच्या परिसरात घडली. या हल्ल्यात वेदांत राजकुमार शिंदे (वय १९, रा. लोहियानगर, गंज पेठ) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी सराइतासह चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ओम गायकवाड, त्याचे साथीदार आनंद, रोहन, सुमीत अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वेदांतने ओमच्या मैत्रिणीला हेअर स्टाइल कोर्ससाठी मॉडेल म्हणून नेले होते. त्यामुळे आरोपी ओम आणि त्याच्या साथीदारांनी मंगळवारी सायंकाळी वेदांतला टिळक रस्त्यावरील सर परशुराम महाविद्यालयाच्या परिसरात गाठले.
आरोपींनी वेदांतला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार करून चौघेजण पसार झाले. याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे करीत आहेत.