पुण्यातील ससून हॉस्पिटल या सरकारी रुग्णालयातील ड्रग तस्कर ललित पाटीलच्या पलायन नाट्याचे कवित्व अजून संपलेले नाही. तोच पुन्हा तेथूनच आणखी एका आऱोपीने रविवारी (ता. 11) पलायन केल्याने पुणे पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली. तसेच त्यातून पुण्याचे नवे सीपी अमितेशकुमार यांना दणक्यात सलामीही मिळाली. फेब्रुवारीच्या दोन तारखेला अमितेशकुमार यांनी पुण्याचे पोलिस आय़ुक्त म्हणून पदभारी स्वीकारला. चार दिवसांनीच त्यांनी (ता. 6) शहरातील गुंड, त्यातही संघटीत टोळीप्रमुखांना बोलावून त्यांना समज दिली. सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट न टाकण्यास सांगितले. पण, हा आदेश लगेच फाट्यावर मारल्याचे दिसून आले. त्यानंतर तीन दिवसांतच (ता. 9) शहरात झुंडशाही दिसली. पोलिसांच्या नाकावर टिच्चून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या मोटारीवर हल्ला झाला. त्यातून नव्या सीपींचे दणक्यात स्वागत झाले. त्याप्रकरणात कारवाई सुरु असताना ससून रुग्णालयातून आणखी एक आरोपी आज पळाला अन् 48 तासांत पुणे पोलिसांवर पुन्हा नामुष्कीची पाळी आली. त्यातून आता त्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.






गेल्यावर्षी 2 ऑक्टोबरला ड्रग तस्कर ललित पाटील याने पोलिसांच्या हातावर तुरी देत ससूनमधून पलायन केले होते. त्यावर अंतिम कारवाई अजून सुरु असताना तेथूनच पुन्हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती यांना सोशल मीडियातून धमकावल्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या मार्शल लुईस लीलाकर या आरोपीने पलायन केले अन् ससूनबरोबर पुणे पोलिसही पुन्हा चर्चेत आले. वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले. 48 तासांत पुणे पोलिसांवर पुन्हा टीकेची मोठी झोड उठली.
मार्शलने त्यांच्या हातावर तुरी देण्याच्या दोन दिवस अगोदरच 9 तारखेला वागळे आणि त्यांच्या निर्भय बनोच्या सहकाऱ्यांवर पुण्यात पोलिसांच्या बंदोबस्तात हल्ला झाला. त्यांची मोटार फोडण्यात आली. त्यातून सत्ताधारी वगळता विरोधी पक्षांसह सर्व स्तरातून पुणे पोलिसांवर सडकून टीका सुरु झाली. ती शमली नसतानाच मार्शल पळाला अन् पुणे पोलिस पुन्हा रडारवर आले. टीकेचे धनी झाले.
पाटील पलायन प्रकरणात त्याने अनेकांशी मिलीभगत केल्याचे नंतर दिसले. तसा प्रकार मार्शलच्या बाबतीत तूर्तास दिसत नसून पोलिस व रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा मात्र ठळक झाला आहे. पळालेल्या पाटीलला पकडण्यासाठी पोलिसांना खूप पापड लाटावे लागले. तसेच मार्शलच्या बाबतीत होणार आहे. त्याने अब्रू चव्हाट्यावर आल्याने त्याला पकडण्यासाठी पोलिस जंगजंग पछाडतील. त्यातून तो पकडलाही जाईल. पण, बूंद से गई वो हौद से नहीं आती, या न्यायाने गेलेली इभ्रत पुणे पोलिसांना परत मिळणार नाही.
दुसरे कुमार येऊनही गुन्हेगारी कायमच
यापूर्वीचे पुण्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांच्या जागी अमितेशकुमार आले आहेत. रितेशकुमार यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोका आणि एमपीडीए पॅटर्न राबवला. `मोका`कारवाईचं, तर त्यांनी शतक केलं. तरीही शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आली नाही. त्यांचा हा उतारा फेल गेला. त्यानंतर अमितेशकुमार यांनीही मोकाचा धडाका लगेच सुरु केला. पण, त्याचाही काही उपयोग होत नसल्याचे दिसून आले आहे. कारण दुसरीकडे त्यांचे स्वागत आठवड्यातच राजकीय झुंडशाही व नंतर आरोपीच्या पलायनाने झाले. त्यानंतर पंधरवड्य़ातच काल औंधला पुन्हा गोळीबार झाला. त्यामुळे नव्या सीपींची वाटचाल सोपी नसल्याचा प्रत्यय आला आहे.
गृहखाते फडणवीसांकडे जाताच गुन्हेगारीचा वाढतोय आलेख
राज्याचे गृहखाते देवेंद्र फडणवीसांकडे आहे. ते यापूर्वी मुख्यमंत्री असतानाही हा विभाग त्यांच्याकडेच होता. त्यावेळी सुद्धा त्यांचे होम टाऊन नागपूरसह राज्यात गुन्हेगारीचा आलेख वाढला होता. त्यातून विरोधकांच्या टार्गेटवर ते आले होते. आता पुन्हा त्यांच्याकडे हे खाते येताच राज्यातील गुन्हेगारीने मोठी उचल खाल्ली आहे. थेट उल्हासनगर हिललाईन (जि. ठाणे) पोलिस ठाण्यातच गोळीबार झाला. गेल्या पंधरवड्यात राज्यात चार गोळीबाराच्या घटना घडल्या. यूपी, बिहारसारख्या त्या महाराष्ट्रात कॉमन होऊ लागल्याने आता फडणवीसांच्या राजीनाम्याचीच मागणी पुढे आली आहे.
आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून फडणवीसांकडील गृहखाते काढून ते भाजपच्या दुसऱ्या कोणाकडे पक्षाचे चाणक्य सोपविण्याची खेळी खेळतील. परंतू, हा विभाग फडणवीसांना मिळताच राज्यातील गुन्हेगारी उचल खाते हा दुर्दैवी योगायोग असल्याचे आकडेवारी सांगत आहे. आणखी एक योगायोग म्हणजे पुणे सीपी अमितेशकुमारांना नागपूरहून फडणवीसांनीच आणले आहे.











