जयंत पाटलांनी ‘त्या’ कृतीनं राजकीय धुरळा उडवला; पुन्हा महायुतीत जाण्याच्या चर्चांना उधाण

0

आगामी स्थानिकसाठी सांगली जिल्ह्यात भाजपने विशेष लक्ष घातले असून, भाजपने नुकताच जिल्हाध्यक्षांसह मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपले टार्गेट फिक्स केलं आहे. त्याच अनुषंगाने महायुतीतील तिन्ही पक्षांनी यांच्याकडे आपले जिल्हाध्यक्ष वाळवा तालुक्याचे नियुक्त केले आहेत.

भाजपनंतर जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या सम्राट महाडिक ग्रामीणची जबाबदारी दिली आहे. यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये जयंत पाटील यांच्याविरोधात महायुती म्हणण्यापेक्षा, सम्राट महाडिक, निशिकांत पाटील आणि आनंदराव पवार अशीच थेट लढत होणार, यात शंकाच नाही. पण लढत होण्याआधीच वाळवा तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता पुन्हा एकदा तापले असून जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. याला कारण ठरली जयंत पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यात झालेली भेट!

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

वाळवा तालुक्यातील एका विवाह सोहळ्यात आमदार जयंत पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आमने-सामने आले. फक्त आमने-सामनेच आले नाही, तर जयंत पाटील यांनी सम्राट महाडकांचा सत्कारही केला. या सत्कारामुळेच आता या चर्चांना उकळी आली आहे. याआधी देखील त्यांच्या संस्थेच्या कार्यक्रमाला भाजप नेते नितीन गडकरी आले असतानाही, अशा पद्धतीने चर्चा सुरू झाल्या होत्या. तर ते महायुतीत जाणार असल्याचे बोलले जात होते. त्यावेळी जयंत पाटील यांनी, सर्व तर्कवितर्कांना इन्कार देत, त्या फक्त पोकळ चर्चा असल्याचे स्पष्ट केले होते.

यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चेवेळी ते सत्तेत सहभागी होतील असे म्हटले जात होते. पण अजित पवार यांनी या चर्चेतली स्वत: हवा काढली होती. तर जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या निशिकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद दिले. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम लागला होता. यानंतर शांत बसलेली अशा चर्चेंची राळ पुन्हा उठली असून जयंत पाटील महायुतीत जाणार का? असे सवाल होत असून त्यांनी महाडिक यांचा केलेला सत्कार हे त्यामागचे संकेत आहेत, अशीही कुजबूज सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

दरम्यान जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांचीही नुकतीच सातारा इथं भेट घेतली होती. त्यापाठोपाठ त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सांगली दौऱ्यात संवाद साधला होता. तर आता थेट त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांची भेट घेत सत्कार केला. ज्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मानले जात आहेत.

जयंत पाटलांची कुटनीती अन् तर्क

वाळवा-इस्लामपूर मतदारसंघ जयंत पाटलांचा बालेकिल्ला मानला जातो. स्थानिकसह जिल्हा बँक, बाजार समितीवर त्यांचा होल्ड आहे. यामुळे त्यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरूंग लावण्याचा राजकीय डाव, सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाध्यक्ष पदी भाजपने सम्राट महाडिक, अजित पवारांनी भाजपचे आधीचे जिल्हाध्यक्ष आणि आत्ता राष्ट्रवादीत सक्रिय असणारे निशिकांत पाटील, तर एकनाथ शिंदे यांनी आनंदराव पवार यांची नियुक्ती केली आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

राजकीय खेळी गुलदस्त्यात

जयंत पाटील शरद पवार यांच्या मुशीत तयार झालेल्या मल्लाप्रमाणे असून तेही तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे आहेत. कधी कोणता डाव खेळतील आणि कधी दुसऱ्याच्या पकडीतून निसटतील हे सांगता येत नाही. आताही त्यांनी तिन्ही जिल्हाध्यक्ष त्यांच्याच मतदारसंघातील असतानाही फक्त महाडिक यांचाच सत्कार केला आहे. यामुळे त्यांची नेमकी राजकीय खेळी कोणती आहे? याबाबत आता तर्क लढविले जात आहेत.