गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा सुव्यस्था ढासळल्याचे चित्र आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह चालू असताना गोळीबार करण्यात आला.






या पाठोपाठ जळगावात तीन दिवसांपूर्वी अज्ञातांकडून भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
बाळू मोरे उर्फ महेंद्र मोरे हे चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक होते. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ते आपल्या कार्यालयात बसलेले असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून पाच अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी बाळू मोरे यांच्यावर गोळीबार केला. या हल्लेखोरांनी त्यांच्यावर 8 गोळ्या झाडल्या. यानंतर हल्लेखोर कारमधूनच पसार झाले.
पूर्व वैमनस्यातून मोरे यांच्यावर हा हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. याच अवस्थेत माजी नगरसेवक मोरेंना नाशिकच्या अशोका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकाराचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
छातीत, पोटात अन् पायाला लागली गोळी
हल्लेखोरांनी मोरे यांच्यावर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात त्यांच्या छातीला, पोटाला आणि पायाला गोळी लागली होती. त्यानतंर त्यांना उपचारासाठी तात्काळ नाशिक येथील अशोका रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. दरम्यान या हल्ल्यावेळी मोरे यांना वाचविण्यासाठी गेलेले अजय बैसाणे याच्यावरही हल्लेखोरांनी गोळीबार केला होता.
सात जणांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पाच हल्लेखोर आणि कट रचनारे दोन असे एकूण सात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. आता बाळू मोरे यांचा उपचार सुरू असताना निधन झाल्याने या प्रकरणी खुनाचे कलम लावण्यात येणार आहे.
गोळीबारानंतर हल्लेखोर फरार
गोळीबाराच्या घटनेनंतर चाळीसगाव शहरात अद्यापही तणावाचे वातावरण आहे. नागरिकांमध्ये घबराट आहे. पोलिसांनी गोळीबार प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. पोलीस संशयित आरोपींच्या शोध घेत आहेत. गोळीबारानंतर संशयितांनी पलायन केले आहे.
हल्लेखोरांचे वाहन पोलिसांच्या हाती
गोळीबार केल्यानंतर मारेकरी ज्या वाहनातून पसार झाले होते, ते वाहन पोलिसांच्या हाती लागले आहे. यातील आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचे पाचही पथक रवाना झालेले आहे. या वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात दोन जिवंत काडतुसे, कोयता आणि इतर साहित्य आढळून आले आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
दरम्यान, नाशिकच्या अशोका रुग्णालयात बाळू मोरे यांचा मृत्यू झाला. रुग्णालय परिसरात बाळू मोरे यांचे समर्थक आणि नातेवाईक मोठ्या प्रमाणात जमले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा
महेश गायकवाड, अभिषेक घोसाळकर, बाळू मोरे यासारख्या एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे, तसेच पोलिंसावर विश्वास ठेवायचा कसा? असा सवाल उपस्थित करत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जनतेच्या मनातील दहशत कमी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न
चाळीसगाव येथे माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर तसेच नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर पोलीस आता चांगलेच अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. गावातील काही खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीसह तडीपार असताना शहरात फिरून दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी गाव भर फिरवत त्यांच्याबाबत जनतेच्या मनातील दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.









