मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीमध्ये नाग शिरला होता, यानंतर सर्पमित्रांना बोलवून या नागाला रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वांद्रे पूर्व येथील कलानगरच्या मातोश्री बंगल्यामधून वाईल्ड लाईफ अॅनिमल प्रोटेक्शन ऍण्ड रेस्क्यू असोसिएशन संस्थेला फोन आला. आमच्या बंगल्याच्या आवारात साप फिरत असल्यामुळे सर्पमित्रांची मदत हवी आहे, असं फोनवरून सांगण्यात आलं.






मातोश्रीवरून फोन आल्यानंतर संस्थेचे सर्पमित्र अतुल कांबळे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांना पाण्याच्या टाकीमागे नाग बसलेला दिसला. विषारी जातीच्या या नागाची लांबी अंदाजे 4 फूट लांब होती.
या नागाला रेस्क्यू करून याबाबतची माहिती ठाणे वन विभागाच्या कंट्रोल रूमला देण्यात आली. सापडलेला नाग पूर्णपणे व्यवस्थित असल्यामुळे वनविभागाच्या गाईडलाईन्सनुसार त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी रेस्क्यू ऑपरेशन झाल्यानंतर सर्पमित्रांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. सर्पमित्रांनी पकडलेला हा नाग ठाकरे कुटुंबाला दाखवण्यात आला, तेव्हा तिथे उद्धव ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.











