सोलापुरातील एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलीय. अजिंक्य जयवंत राऊत असे त्यांचे नाव आहे. लेडी डफरीन चौक ते जुन्या एम्प्लॉयमेंट चौकादरम्यान असलेल्या प्रसिद्ध हॉटेल ध्रुवचे अजिंक्य राऊत हे मालक होते. त्यांचे वडील दिवंगत डॉ. जयवंत राऊत हे निष्णात शल्यविशारद होते. प्रतिष्ठित आणि श्रीमंत घराण्यातील अजिंक्य राऊत यांचाही मोठा मित्र परिवार होता. यात अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, सिनेनाट्य कलावंत, उद्योजकांचा समावेश होता. मात्र अलिकडे राऊत हे आजारी होते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.






विजापूर रस्त्यावरील इंदिरा नगरमध्ये स्वतःच्या निवासस्थानी राऊत यांनी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली. त्यावेळी घरात दुसऱ्या खोलीत असलेल्या त्यांच्या पत्नी धावून आल्या. त्यांनी शेजारांच्या मदतीने रूग्णवाहिका मागवून पती अजिंक्य यांना एका खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. विजापूर नाका पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.











