जगभरातील मोठ्या गुंतवणूकदारांसाठी भारत हा सर्वात मोठा देश म्हणून उदयास आला आहे आणि आता आगामी काळात ड्रॅगन म्हणजेच चीनला मागे टाकण्याची क्षमता भारतात आहे. ग्लोबल बँकिंग फर्म मॉर्गन स्टॅन्लेने भारताला त्यांच्या इमर्जिंग मार्केट लिस्टमध्ये चांगले रेटींग दिले आहे तर चीनचे रेटींग कमी केले आहे. उदयोन्मुख बाजारपेठांच्या यादीत भारताने मोठी झेप घेतली आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या मते, भारताचे दरडोई उत्पन्न सध्या केवळ 2,500 डॉलर आहे तर चीनचे 12,700 डॉलर आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या विश्लेषकांनी सांगितले की, भारत दीर्घकालीन तेजीच्या मार्गावर आहे, तर चीनमधील ही तेजी आता संपणार आहे.






कोविडनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने वेग पकडला
मॉर्गन स्टॅन्ले विश्लेषकांच्या मते, भारताचे कर्ज GDP च्या 19 टक्के आहे तर चीनचे 48 टक्के आहे. तसेच, जीवन विमा पॉलिसी फक्त 2 टक्के भारतीय कुटुंबांकडे उपलब्ध आहे. कोविडचे निर्बंध हटवल्यानंतर भारतात उत्पादन आणि सेवा पीएमआयमध्ये वाढ झाली आहे, तर चीनमध्ये झपाट्याने घट झाली आहे. भारतात रिअल इस्टेट व्यवहारात मोठी वाढ झाली आहे.
मॉर्गन स्टॅनले अर्थशास्त्रज्ञ मानतात की चीनचा जीडीपी वाढीचा दर केवळ 3.9 टक्के असेल तर भारताचा जीडीपी वाढीचा दर 6.5 टक्के असेल. मॉर्गन स्टॅन्लेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारताची परिस्थिती मोठ्या प्रमाणात चीनच्या भूतकाळाशी मिळती जुळती आहे. अहवालात म्हटले आहे की, चीनमध्ये काम करणा-या लोकसंख्येमध्ये घट झाली आहे.
मॉर्गन स्टॅन्ले म्हणाले की, उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारत आता अव्वल क्रमांकाची, सर्वाधिक पसंतीची बाजारपेठ आहे. डिसेंबरपर्यंत सेन्सेक्स 68,500 चा स्तर गाठेल अशी त्यांची अपेक्षा आहे. अमेरिकेत मंदी नसेल तरच हे लक्ष्य गाठले जाईल.
अमेरिकेचे रेटिंग खाली
काल फिच या रेटींग एजन्सीने जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेला म्हणजेच अमेरिकेला झटका दिला होता. बुधवारी, रेटिंग एजन्सी फिचने अमेरिकेचे रेटिंग कमी केले. फिचने यूएस रेटिंग AAA वरून AA+ वर खाली केले आहे. यानंतर अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली.











