बॉलिवूडचे सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. कलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या एका उपासकाने स्वतःच्या आयुष्याला पूर्णविराम दिल्याने अख्खं बॉलिवूड विश्व हादरवून गेलं आहे. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी नितीन देसाई यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे रुग्णालयात पाठवला होता. तिथे ४ डॉक्टरांच्या पथकांनी त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. दरम्यान, नितीन देसाई यांचा शवविच्छेदन अहवाल देखील समोर आला आहे.
नितीन देसाई यांचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला, अशी प्राथामिक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, शवविच्छेदन झाल्यानंतर देसाई यांचं पार्थिव पुन्हा ND स्टुडिओत नेलं जाणार असून तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, आर्थिक अडचणी वाढल्यामुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याची प्राथामिक माहिती आहे. पोलिसांनी नितीन देसाई यांचा मोबाईल देखील ताब्यात घेतला आहे. मोबाईलमधील काही ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.
या ऑडिओ क्लिपमध्ये चार जणांचं नाव असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पण ती नावं कोणची आहेत हे अद्याप समोर आलेलं नाही. ऑडीओ क्लिपची पडताळणी सर्वप्रथम पोलिसांकडून केली जाईल. शिवाय नितीन देसाई यांच्या मोबाईलमध्ये असलेल्या ऑडिओ क्लिप त्यांच्याच आवाजातील आहेत का? याची खातर रायगड पोलिसांकडून करण्यात येणार आहे.