हवामान बदलाचा जगातील सर्वच देशांना फटका बसत आहे. भारतीय उपखंडावर देखील हवामान बदलाचा परिणाम झाला आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने ‘भारतीय भूप्रदेशात झालेल्या हवामान बदलाचे मूल्यमापन’ हा अहवाल प्रसिध्द केला आहे. यामध्ये भारतीय उपखंडावर झालेल्या हवामान बदलाच्या परिणामाचे व्यापक मूल्यमापन करण्यात आलं आहे. तापमानात मोठी वाढ झाल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
या अहवालातील काही मुद्दे…
भारतीय उपखंडात 1950 ते 2015 या कालावधीत दैनंदिन पर्जन्यमानाची तीव्रता प्रतिदिन दीडशे मिलीमीटरपेक्षा अधिक होण्याच्या वारंवारतेत सुमारे 75 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत दिली. गेल्या अडीच दशकांमध्ये दक्षिण हिंदी महासागराची समुद्र पातळी दर वर्षी 3.3 मिलिमीटर या वेगाने वाढत असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे.
महत्त्वाचे मुद्दे
वर्ष 1901 ते 2018 या कालावधीत भारताचे सरासरी तापमान सुमारे 0.7 अंश सेल्सियसने वाढल्याची माहिती या अहवातून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वर्ष 1950 ते 2015 हा कालावधीत दैनंदिन पर्जन्यमान अतिप्रमाणात (पर्जन्यमानाची तीव्रता प्रतिदिन दीडशे मिलीमीटरपेक्षा अधिक )होण्याची वारंवारता सुमारे 75 टक्क्यांनी वाढली आहे.
वर्ष 1951 ते 2015 या काळात दुष्काळ पडण्याची वारंवारता आणि दुष्काळाची क्षेत्रीय व्याप्ती लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.
वर्ष 1993 ते वर्ष 2017 या अडीच दशकांमध्ये दक्षिण हिंदी महासागराची समुद्र पातळी दरवर्षी 3.3 मिलिमीटर या वेगाने वाढत आहे.
वर्ष 1998 ते 2018 या काळात पावसाळ्यानंतर अरबी समुद्रात भयंकर चक्रीवादळ येण्याचे प्रमाण वाढले आहे.
भारतीय हवामान विभाग (आयएमडी)भारतीय भूप्रदेशातील हवामानावर नियमितपणे लक्ष ठेवून असते. हाती आलेल्या निरीक्षणावरून ‘वार्षिक हवामानविषयक सारांश’ या वार्षिक हवामानाचे प्रकाशन करते. आयएमडी मासिक हवामानविषयक सारांश अहवाल देखील जारी करत असते. वार्षिक हवामानविषयक सारांशामध्ये संदर्भित कालावधीतील तापमान, पाऊस, अतितीव्र हवामानविषयक घडामोडी यांच्याविषयीच्या माहितीचा समावेश असतो. हवामान बदलाचा मोठा परिणाम होऊ शकतो. पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. काही परिसरात जास्त पाऊस, तर काही परिसरात कमी पाऊस पडू शकतो. यामुळे कुठं ओला पडले तर कुठे कोरडा दुष्काळ पडतो. समुद्रातील पाण्याची पातळी वाढेल अशी माहितीही या अहवालात देण्यात आली आहे. हवामान बदलाचा मोठा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होण्याचा धोका आहे.