महाराष्ट्रातलं ४ वर्षात चौथं सत्ता समीकरण: राजकीय भूकंपात कुणाला संधी, कुणाची मंदी?

0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक नवा ट्विस्ट, नवं वादळ धडकलंय.. 2019 नंतर अवघ्या चार वर्षात महाराष्ट्रातलं चौथं सत्ता समीकरण साऱ्यांनी पाहिलं. शिवसेना, राष्ट्रवादी…महाराष्ट्रातले दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष..दोन्ही पक्षांना खिंडार पडलंय..साहजिकच या नव्या समीकरणात महाराष्ट्राच्या सगळ्याच राजकारणाची फेरमांडणी होणार आहे. आधी एकनाथ शिंदेंचं बंड..पाठोपाठ अजित पवारांचीही वेगळी वाट…महाराष्ट्राच्या राजकारणात जणू भूकंपाची मालिकाच सुरु आहे. महाराष्ट्राच्या राजकीय अवकाशात एका बाजूला गर्दी वाढत चाललीय, तर दुसरीकडे पोकळीही तयार होतेय…प्रत्येक पक्षावर या घडामोडींचा परिणाम होणं साहजिकच आहे.. सुरुवात अँक्शनमध्ये असलेल्या पक्षाकडून..राष्ट्रवादीकडून..

राष्ट्रवादी आणि भाजप..खरंतर इतिहासात अनेकदा जवळ येता येता दूर राहिले होते..अगदी 2014 चा बिनर्शत पाठिंबा असेल, त्यानंतर 2017 च्या आसपास झालेली चर्चा असेल किंवा पहाटेचा शपथविधी..पवार भाजपशी जवळीक तर दाखवायचे, पण थेट कधीच त्यांच्यासोबत गेले नव्हते..ते धाडसी पाऊल अजितदादांनी अखेर टाकलंय. अजित पवार- पवारांनी भाजपसोबत ठेवलेले अंतर अजितदादांनी मिटवून टाकलंय. राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसपासून दूर जात एकदम विरोधी भाजपसोबत त्यांनी मोट बांधली आहे. उपमुख्यमंत्रीपद तर त्यांना पाचव्यांदा मिळतंय, त्यांच्यासाठी हे पद विशेष नाहीय. पण भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्रीपदाचं त्यांचं स्वप्न पूर्ण होणार का हे पाहणं महत्वाचं असेल. शरद पवार समोर असतानाच, त्यांचा पक्ष त्यांच्यापासून हिरावून आपली ताकद अजितदादांना दाखवावी लागणार आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

शरद पवार पुन्हा पक्ष बांधणार –

वयाच्या 83 व्या वर्षी शरद पवारांना पक्ष पुन्हा उभा करावा लागणार आहे. राष्ट्रीय राजकारणात विरोधकांची मोट बांधण्यात पुढाकार घेणाऱ्या पवारांना आता स्वताचाच पक्ष आधी नीट करण्यात वेळ द्यावा लागेल. 2019 ची निवडणूक त्यांनी प्रचारानं गाजली होती. पुन्हा तोच झंझावात पवार रिपीट करु शकणार का हा प्रश्न आहे.

सुप्रिया सुळे –

संघटनेत पहिली जबाबदारी मिळते ना मिळते तोच सुप्रिया सुळेंना फुटलेला पक्ष हाती आलाय. प्रशासनाचा, संघटनेचा कुठलाही अनुभव नसताना या सगळ्या स्थितीला त्यांना सामोरं जावं लागणार आहे. दादांची आमदारांवर पकड आहे, निवडणुकांच्या रणनीतीत ते माहीर आहेत. अशावेळी दिल्लीतल्या वर्तुळात आत्तापर्यंत वावरलेल्या सुप्रियाताई राज्याच्या जमिनीवरच्या राजकारणात कशा उतरतात हे पाहावं लागेल.

एकनाथ शिंदेंना फटका ?

राष्ट्रवादीतल्या घडामोडींचा सर्वात मोठा साईड इफेक्ट कुणावर होणार असेल तर तो एकनाथ शिंदेवर..मुख्यमंत्री असले तरी आत्तापर्यंत त्यांच्या धाडसामुळेच भाजपला सत्ता मिळाली हे दिसत होतं. पण आता त्यात अजित पवारांच्या धाडसानं त्यांचं मूल्य कमी केलंय. प्रशासकीय कामात मातब्बर मानले जाणारे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोन दोन उपमुख्यमंत्री त्यांच्यासमोर आहेत. त्यामुळे आपला प्रभाव टिकवण्यासाठी एकनाथ शिंदेंना आता झगडावं लागेल. शिवाय सुप्रीम कोर्टाच्या निकालाची टांगती तलवारही समोर आहेच. या सगळ्यात कर्ता करविता भाजप आहे हे तर उघड झाले आहे. 105 आमदार असलेला आमदार आधीच मुख्यमंत्रीपदापासून दूर आहे. भाजपनं अनेकांना सत्तेचं स्वप्न दाखवत आपल्या पक्षात मेगाभरती केली. त्यात आता नवा मित्रपक्ष जोडावा लागल्यानं सत्तेचा वाटा कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत असलेल्या नेत्यांची प्रतीक्षा वाढली आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

देवेंद्र फडणवीस –
दोन वर्षात दोन मोठे पक्ष फोडण्यात, जवळपास 70 आमदार आपल्या बाजूला वळवण्याची कामगिरी देवेंद्र फडणवीस यांनी करुन दाखवली. पण ही कामगिरी केली म्हणून कौतुक करावं की 105 आमदार असतानाही हे करावं लागतं या अपयशावर बोट ठेवावं हा प्रश्नच आहे. फडणवीस राज्यात भाजपचे विरोधक तर संपवत चालले आहेत, पण स्वताच्या पायावर महाराष्ट्रासारखं राज्य भाजपला जिंकून देऊ शकत नाहीयत हेही अधोरेखित होतंय. लोकसभेचं उद्दिष्ट पूर्ण झालं की फडणवीस दिल्लीत राहतात की राज्यातच हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

महाराष्ट्रात या सगळ्या राजकारणात काँग्रेस पक्षासाठीही मोठी पोकळी तयार होऊ शकते. विरोधाची स्पेस घेण्यासाठी पक्ष किती ताकद लावतो यावर हे यश अवलंबून असेल. कारण भाजपविरोधी मतांमध्ये मोठा भागीदार होण्याची संधी यानिमित्तानं काँग्रेसला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्हीमध्ये आता सहानुभूतीच्या लाटेची चर्चा होईल. पण या दोन्ही पक्षांचे राज्यात ठराविक पॉकेट्स आहेत. त्या तुलनेत काँग्रेसचं नेटवर्क हे राज्यभरात पसरलेलं आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

नाना पटोले-
2019 च्या निवडणुका झाल्या त्यावेळी काँग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर होता. पण शिवसेना, राष्ट्रवादीत झालेल्या फुटीमुळे काँग्रेस आपोआप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. संख्येच्या जोरावर विरोधी पक्षनेते पदही काँग्रेसला मिळू शकतं..काँग्रेसमध्ये सध्या प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा असताना राहुल गांधींसोबत असलेल्या संबंधांच्या जोरावर नाना पटोले आपलं पद टिकवणार का..आणि ज्यावेळी काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पद मिळण्याची संधी आहे.

त्यावेळी हे पद कुणाला मिळणार याचीही उत्सुकता असेल. महाराष्ट्रात गेली दोन तीन वर्षे निवडणुका झालेल्या नाहीयत…पुढच्या काळात महापालिका, लोकसभा, विधानसभा अशा सगळ्याच निवडणुका प्रलंबित आहेत. त्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांची परीक्षा जवळ आलीय. कुणाला किती मार्कानं पास करायचं याचा निकाल जनतेच्याच हातात असेल.