औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी काल रविवारी (2 जुलै) दुपारपर्यंत प्रचंड खलबतं झाली. राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांसोबत अजित पवारांची बैठक पार पडली. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे या देखील या बैठकीत होत्या. या बैठकीत थेट सत्तेत सामील होण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असा विचार सर्वसामान्यांच्या मनातही नसेल. पण दुपारी एक वाजेनंतर अनपेक्षित अशा घडामोडी घडू लागल्या. अजित पवार जे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत तेच आता सत्तेत सामील होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी चर्चा समोर आली. तसेच ही चर्चा खरी ठरली. पण या घडामोडींनंतर आता शिंदे गटात हालचाली वाढल्या आहेत.






अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सात नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असेलेले दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांचाही समावेश आहे. अजित पवार यांच्या सत्तेत सामील होण्याच्या निर्णयाने राष्ट्रवादी पक्षात फूट पडलीय. ही घटना ताजी असताना आता सत्ताधारी पक्षांमध्येही धुसफूस उफाळण्याची शक्यता आहे. कारण सत्ताधारी शिवसेनेत नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडतंय?
उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत येताच शिवसेनेच्या शिंदे गटात धुसफूस सुरु झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ज्यांच्याविरोधात बोललो त्यांच्यासोबतच कसं बसायचं? असा सवाल या आंदारांचा आहे. आता मोठी खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातील, अशी धाकधूक शिंदे गटाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांच्या सत्तानाट्याने शिंदे गटाचे अनेक आमदार नाराज झाले आहेत. बहुतांश आमदार हे स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त करत आहेत. काही आमदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवरुन नाराजी व्यक्त केली आहे.
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात सातत्याने बोललो, असं आमदारांचं म्हणणं आहे. तसेच शिवसेनेत फूट झाली तेव्हा अजित पवार निधी देत नसल्याचं कारण देत हे सगळे आमदार बाहेर पडले. आता त्याच अजित पवार यांच्यासोबत सत्तेत कसं बसायचं? असा प्रश्न या आमदारांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे अजित पवार हे सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदारांची मंत्रीपदाची संधी डावलली जाणार आहे. त्यामुळे अनेक आमदारांमध्ये नाराजी आहे. याशिवाय या आमदारांच्या मतदारसंघांमध्येही त्यांची राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारासोबत मतभेद आहेत. त्यामुळे त्यांच्यात नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे.
१३ आमदारांचं तिकीटे धोक्यात? धाकधूक वाढली
शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होणार त्यामुळेच अजित पवार यांना आपल्याकडे खेचून देवेंद्र फडणवीस यांनी ही खेळी खेळली अशीही आणखी एक चर्चा सुरु होती. मात्र, अजित पवार यांच्यामुळे शिंदे गटातील ‘या’ नेत्यांची आमदारकी धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याविरोधात भाजप, शिवसेना असा सामना होता. या निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राजकीय खेळीमुळे महाविकास आघाडी निर्माण झाली. मात्र, त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 13 उमेदवारांचा पराभव करून शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. अजित पवारांच्या शपथविधीने शिंदे गटाच्या विद्यमान तेरा आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
कोण आहेत ते तेरा आमदार?
मतदारसंघ शिवसेना उमेदवार मते राष्ट्रवादीचे उमेदवार मिळालेली मते
पाटण शंभूराज देसाई 106266 सत्यजित पाटणकर 92091
पैठण संदीपान भुमरे 83403 दत्तात्रय गोरडे 69264
परांडा तानाजी सावंत 106674 राहुल मोटे 73772
रत्नागिरी उदय सामंत 118484 सुदेश मयेकर 31149
कोरेगाव महेश शिंदे 101487 शशिकांत शिंदे 95255
एरंडोल चिमणराव पाटील 82650 अण्णासाहेब पाटील 64648
चोपडा लताबाई सोनवणे 78137 जगदीश्चंद्र वळवी 57608
वैजापूर रमेश बोरनारे 98183 अभय पाटील 39020
नांदगाव सुहास कांदे 85275 पंकज भुजबळ 71386
कुर्ला मंगेश कुडाळकर 55049 मिलिंद कांबळे 34036
कर्जत महेंद्र थोरवे 102208 सुरेश भाऊ लाड 84162
दापोली योगेश कदम 95364 संजय कदम 81786
राधानगरी प्रकाश आबीटकर 105881 के. पी. पाटील 87451











