वर्षभरापूर्वी शिवसेनेत उभी फुट पडली आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं तर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी शिंदे फडणवीस सरकार मध्ये शामिल होत मंत्री पदाची शपथ घेतली. आता या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याकडे लक्ष लागून आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर दुपारचा शपथ विधी झाला आणि पुन्हा एकदा राजकीय भूंकप झाला.






राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तीन वर्षात तीन वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सोबत 8 आमदारही मंत्री झाले. या खळबळजनक शपथविधीनंतर आता राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप झाला आहे. भाजपा शिवसेना यांचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधीच राष्ट्रवादीचा शपथ विधी झाल्याने त्यांना कोणती खाती दिली जाणार? कोणत्या मंत्र्यांची खाती काढून त्यांना दिली जाणार? या चर्चांनी जोर धरलाय.
राष्ट्रवादीला कोणती खाती?
1) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील परिवहन, सामान्य प्रशासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आपत्ती व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक व औकाफ खातं
2) देवेंद्र फडणवीस यांच्याकडील अर्थमंत्री, गृहनिर्माण आणि राजशिष्टाचार खातं राष्ट्रवादी मंत्र्यांना दिले जाण्याची शक्यता आहे, यातील अर्थखातं अजित पवारांना मिळू शकतं.
3) राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खातं
4) सुधीर मुनगंटीवार यांच्याकडील मत्स्य व्यवसाय खातं
5) रविंद्र चव्हाण यांच्याकडील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं
6) चंद्रकांत पाटील यांच्याकडील वस्त्रोद्यग खातं
7) गिरीष महाजन यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण खाते
8) अतुल सावे यांच्याकडील मगास व बहुजन कल्याण खाते
9) मंगल प्रभात लोढा यांच्याकडील महिला व बालविकास खातं
ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना मिळू शकतात. विद्यमान मंत्र्यांकडील खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना दिली गेली आहेत, पण भाजपा आणि शिवसेनेचे आमदार मंत्री पदाच्या रांगेत आहेत. त्यांना उर्वरीत 13 मंत्री पदे दिली जातील. हा विस्तार येत्या काही दिवसातच होईल पण राष्ट्रवादीच्या आमदारांना आणखी मंत्री पदे दिले जातील का? यावर कमालिची गुप्तता पाळली गेली आहे.
भाजपा आणि शिवसेना आमदारांच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचा शपथविधी झाला आता उर्वरित आमदारांचा शपथ विधी कधी होईल? याची सर्वत्र चर्चा आहे, पण या आधी एका राष्ट्रीय पक्षातील काही दिग्गज नेते शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामिल होतील आणि जवळपास 3 मंत्री पदे त्यांना दिली जाणार असल्याची खात्री लायक माहिती सूत्रांनी दिली आहे, शिवाय रांगेत असलेले अपक्ष देखील आहेत, यामुळे बऱ्याच जणांना आता राज्यमंत्री आणि महामंडळ अध्यक्ष पदावरच समाधान मानावं लागेल असच दिसतंय.











