काही काळ वाट पाहू अशीच भूमिका; बारामतीच्या घराघरात पदाधिकारी एकत्र पण…

0
1

बारामती – एकीकडे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आणि दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या बाबत विरोधी भूमिका घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी अस्वस्थता होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांनी घेतलेला निर्णय आम्हाला माहिती नव्हता अशी स्पष्ट भूमिका मांडल्यानंतर पुढे आता नेमके काय या बाबतच घराघरात चर्चा सुरु होती. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीकरांना साहजिकच आनंद झाला.

त्यांचा कामाचा धडाका व वेग माहिती असल्याने आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर विकासाला अधिक गती मिळणार या मुळे बारामतीकरांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सत्तेत तेही उपमुख्यमंत्री म्हणून दादा सहभागी झाल्यानंतर विकासाच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असल्याची भूमिका अनेक भाजप व राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनीही मांडली. त्याच वेळेस शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत उद्यापासूनच नव्याने संघटना बांधणी करणार असल्याचे जाहिर केले. युवक व कार्यकर्त्यांवर माझा दृढ विश्वास असल्याचे त्यांनी जाहिर केल्यानंतर आता पुढे नेमके काय होणार या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या सोबत आहे, नरेंद्र मोदी यांच्या समवेत गेल्यास राज्याचा विकास वेगाने होईल हे सूत्र नजरेसमोर ठेवून अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी नमूद केले. दुसरीकडे शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी मात्र वेगळी भूमिका घेतल्याने आता पुढे नेमके काय घडणार या मुळे काही कार्यकर्ते चिंताग्रस्तही झाल्याचे पाहायला मिळाले. पवारसाहेबांचा आशिर्वाद गरजेचा आहे, अशीही भूमिका काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

या बाबत थेट प्रतिक्रीया काही मोजक्या पदाधिका-यांनी दिली असली तरी काही काळ वाट पाहू अशीच भूमिका बारामतीत अनेक कार्यकर्त्यांची आहे. पवारसाहेबांचा आशिर्वादही तितकाच महत्वाचा असल्याचे काही जुन्या पदाधिका-यांचे मत होते. मतभेदानंतर काहीतरी एक भूमिका घ्यायची वेळ येते की काय अशीही भीती काहींनी बोलून दाखवली. अजून काही दिवसानंतर राष्ट्रवादीबाबतचे चित्र स्पष्ट होईल असे अनेकांना वाटत आहे. काहींनी अजित पवार यांच्या समवेतच कायम राहण्याचा निर्धार बोलून दाखविला आहे.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार