राज्याचे उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दिव्यांग शाळेला भेट असता शाळेतील एका दिव्यांग मुलीनं फडणवीस यांना पायानं टिळा लावला. तसंच पायानं ताट धरत त्यांचं औक्षणही केलं. हा क्षण फडणवीस यांनी भावूक शब्दात मांडत ट्विट केले. दरम्यान, पायाने टिळा लावणार्या मुलीसाठी मनसेचा पदाधिकारी सरसावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पायाने टिळा लावून त्यांचे औक्षण करणाऱ्या तरूणीला मनसे पदाधिकारी तुलसी जोशी कृत्रिम हात घेऊन देणार आहे. वाढदिवसानिमित्त हे पुण्यकार्य त्यांना करायचे असल्याचे ट्विट तुलसी यांनी केलं आहे. तसेच, त्यांने संपर्क साधण्यासाठी त्याचा फोन नंबरदेखील शेअर केला आहे.






मला हे पुण्य कार्य करायचे आहे
या हात नसलेल्या अपंग मुलीला कृत्रिम हात घेऊन देणार आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त मला हे पुण्य कार्य करायचे आहे. कृपया या पोस्टच्या माध्यमातून मी विनंती करतो की या अपंग मुलीचा संपर्क क्रमांक मला मिळवून द्यावा.. 8698714975 असे आवाहन केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय… ‘आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा… हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात.
डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की “तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे.
ते पाहून मी इतकंच म्हणालो, “ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत.” या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले- “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!”











