विद्येचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुणे शहरात आज, २७ जून रोजी एका तरुणाने एकतर्फी प्रेंमातून तरुणीवर कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. पुणे शहरातील सदाशीव पेठेत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तसेच प्रशासनावर ताशेरे देखील ओढले आहेत. या धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.






अजित पवारांनी ट्वीट करत घटनेवर भाष्य करत ट्वीट केलं आहे. अजित पवार म्हणाले की, “विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो.
नेमकं झालं काय?
सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस चौकीजवळ आज सकाळी प्रेम संबंधास नकार देणाऱ्या तरुणीवर हा हल्ला करण्यात आला. या कोयत्याने करण्यात आलेल्या या हल्ल्यात युवती जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पसार झालेल्या युवकाला नागरिकांनी पाठलाग करून पकडले आहे. विश्रामबाग पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
या घटनेच्या समोर आलेल्या व्हि़डीओनुसार तरुणी तिच्या दुसऱ्या मित्रासोबत स्कूटीवरून जात असताना शंतनू हा सदाशिव पेठेतील पेरुगेट चौकीपासून काही अंतरावर असलेल्या पावन मारुती मंदिराजवळ दबा धरुन बसला होता. जवळ येताच शंतनूने दोघांना अडवले आणि वाद घालण्यास सुरवात केली. नंतर शंतनूने दोघांवर कोयत्याने हल्ला चढविला. यावेळी तरुणी आणि तिची मित्र जीव वाचविण्यासाठी पळाले. तेव्हा त्याने पाठलाग करून तिच्यावर पुन्हा कोयत्याने वार केला.











