खेड-शिवापूर – पुणे-सातारा महामार्गावर खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ उत्पादन शुल्क विभागाने एका बनावट बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर मंगळवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत सुमारे 85 लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे या कारवाईत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई सहभागी झाले होते.






गोव्यावरून बनावट दारू घेऊन एक कंटेनर मुंबईच्या दिशेने निघाला असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग करून आणि सापळा रचून मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ ही बनावट दारूची वाहतूक करणारा कंटेनर पकडला.
विशेष म्हणजे या कारवाईत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई स्वतः सहभागी झाले होते. यावेळी हा संशयित कंटेनर बाजूला घेऊन त्याची तपासणी केली असता त्यात बनावट दारू आढळली. हा कंटेनर आणि त्यातील सुमारे 85 लाख रुपयांची बनावट दारू उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे.
शंभूराजे देसाई म्हणाले, ‘शेजारच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या बनावट बेकायदेशीर दारूवर कारवाई करण्याची मोहीम आखण्यात आली आहे. आजची कारवाईही त्या मोहीमेनुसारच झालेली आहे. यातील संपूर्ण दारू बनावट आहे. हे बनावट दारू विक्रीचे रॅकेट असण्याची शक्यता आहे. या रॅकेटच्या मुळाशी जाऊन तपास करण्यात येईल.’
उत्तर देण्यास टाळाटाळ
यावेळी पुणे सातारा रस्त्यावर होत असलेली अवैध दारू विक्री, वेळेचे नियम झुगारून सुरू असलेली दारूची दुकाने याबाबत येथे उपस्थित उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रकारांनी विचारणा केली असता, “निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह बघा” असे सांगून या प्रश्नाचे उत्तर देणे संबंधित अधिकाऱ्यांनी टाळले.













