काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते व कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत बारामतीत पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होणार आहे. त्यासाठी धनगर समाज बांधवांनी केलेल्या प्रय़त्नाला आज यश प्राप्त झाले. बेंगलोर येथे बारामतीचे अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे शिष्ठमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटले असता, मुख्यमंत्री महोदयांनी सोमवार (ता.२६ जून) रोजी बारामतीला अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्तांने येत असल्याचे निश्चित केले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे नेते विश्वास देवकाते यांनी स्पष्ट केली. विशेषतः याआगोदर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बारामतीमध्ये निमंत्रीत करण्यासाठी विशेषतः राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी प्रथमदर्शनी चर्चा झाली होती. तसेच संबंधित नेत्यांना पवारसाहेबांनी पत्रव्यवहारही केला होता.
त्यामुळे सिद्धरामय्या यांनी बारामतीला येण्याचे मान्य केले, असेही देवकाते यांनी सांगितले. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बदलत्या राजकिय स्थितीचा विचार करता कर्नाटकमध्ये झालेल्या परिर्वतनाची घौडदौड महाराष्ट्रात बारामतीपासून होण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा बारामती दौरा महत्वपुर्ण ठरेल, अशीही चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे. दरम्यान, पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती साजरी करण्यासाठी चौंडी येथे मागिल पंधरा दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस गेले होते. तसेच तेथे त्यांनी भाजपमय वातावरण निर्माण करण्याचा चांगला प्रय़त्न केला होता.
त्याचाच एक भाग म्हणून संबंधित सत्ताधारी नेते मंडळींनी महत्वपुर्ण घोषणा करताना नगर जिल्ह्याला, तसेच बारामती मेडिकल काॅलेजला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचे जाहिर केले होते. ही गोष्ट ताजी असतानाच आता बारामतीमध्येही अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जंगी साजरी होण्यासाठी येथील अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानसह धनगर समाज बांधवांनी जय्यत तयारी केली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे नेते विश्वास देवकाते आदी पदाधिकाऱ्यांनी सुरवातीपासूनच कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यासाठी थेट शरद पवार यांच्याकडे आग्रह धरला होता.
याबाबत विश्वास देवकाते म्हणाले, भाजपला चारीमुंड्या चित करून कर्नाटकचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले सिद्धरामय्या हे धनगर समाजबांधव आहेत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये अहिल्यादेवी यांची जयंती साजरी करण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यासाठी खुद्द पवारसाहेबांनी आम्हाला सहकार्य केले. महाराष्ट्रात धनगर समाज मोठा आहे. जयंतीच्या निमित्ताने २६ जून रोजी पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील धनगर समाज एकत्र करण्याचा आमचा प्रय़त्न आहे.
त्या कार्य़क्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पवारसाहेब यांच्या हस्ते संसदरत्न पुरस्कार विजेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा नागरी सत्कार करण्याचे नियोजन आहे. दुसरीकडे, बारामतीमध्ये ३१ वर्षांपासून अहिल्यादेवी होळकर यांची मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होते. यांच्या जयंतीच्या निमित्ताने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या येणार असल्याने धनगर समाज बांधवांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.