शिवसेनेनं आजच्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली आहे. या जाहिरातीवरुन आता विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. या जाहिरातील शिंदे-फडणवीस यांना सर्वाधिक टक्के लोकांची पसंती असल्याचं म्हटलं आहे. यावरुन विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. तसेच तुम्ही इतकेच लोकप्रिय आहात तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर करा, असं थेट आव्हानच त्यांनी दिलं आहे.
अजित पवार म्हणाले, “इतकी वर्ष राजकारणात आहे पहिल्यांदा अशी जाहिरात बघितली. ही जाहिरात देऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतः चं हसं करून घेतलं आहे. शिवसेनेनं स्वतःच ठरवून सर्वेक्षण केलं. पण हे सर्वेक्षण कोणी केलं? कोणी सांगितलं की कोणाला किती टक्के पसंती आहे? अशा प्रकारची सर्वेची जाहिरात करण्याचा एक विश्वविक्रमच राज्याच्या प्रमुखांनी केला आहे.
लोकांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा कौल दिला आहे हे ऐकून खूपच आनंद वाटला. कारण चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकांना शिंदे पुढे व्हावेत असं वाटायला लागलं आहे. मग इतकाच जर तुम्हाला लोकांचा पाठिंबा आहे. तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाहीत?”
निवडणुका घेण्याची भीती वाटते
येत्या पंधरा-वीस दिवसांत निवडणुका घेतलेल्या नाहीत याला एक वर्षे होईल. वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विविध पदांसाठी इच्छुक आहेत, तरी सुद्धा तुम्ही निवडणुका घेत नाहीत. उन्हाळा सुरु असतानाही तुम्ही निवडणूक घेतली नाही.
पण आत्ता निवडणुका जाहीर करुन पावसाळा संपल्यासंपल्या तुम्ही निवडणूक घेऊ शकता, पण त्यांना निवडणुका घेण्याची भीती वाटते. एकीकडं मात्र जाहिरातीत मात्र एवढ्या प्रमाणावर खर्च करायचा, याला अर्थ नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली.