महाराष्ट्रातील २१ लोकसभा मतदार संघांत काँग्रेसची परिस्थिती उत्तम आहे. पाच वर्षांत जनतेचे मत बदलले असून आगामी निवडणुकीला सामोरे जाणे भाजपला सोपे नाही, असे मत काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. केंद्रीय कार्य समितीला महाराष्ट्रातील या परिस्थितीचा लेखाजोखा पाठवण्यात आला आहे. विजयाची हमी असलेले २१ मतदारसंघ काँग्रेसने दोन दिवसांत घेतलेल्या जिल्हावार कार्यकर्त्यांच्या बैठकीतून निश्चित करण्यात आल्याचे समजते. विदर्भातील जवळपास सर्व मतदारसंघांत परिस्थिती अत्यंत उत्तम असल्याचे स्पष्ट झाले आहे. गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा इत्यादी मतदारसंघांत वातावरण उत्तम आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेला एकमेव चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनानंतरही पुन्हा विजय मिळवता येईल, याची हमी देतानाच विदर्भातील कार्यकर्त्यांनी नागपुरात ज्येष्ठ भाजप नेते भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनाही जोरदार लढत देता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
मराठवाड्यातील तीन मतदारसंघांबाबत कार्यकर्ता बैठकीत अनुकूल चित्र समोर आले आहे. नांदेड, हिंगोली आणि लातूरच्या तीन जागा काँग्रेसने महाविकास आघाडीत स्वत:कडे ठेवाव्यात, असे मत समोर आले आहे. अन्य मतदारसंघांतील परिस्थिती लक्षात घेता तेथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची परिस्थिती सध्या काँग्रेसपेक्षा चांगली असल्याचे काही कार्यकर्त्यांनी मान्य केल्याचे समजते. धुळे, नंदुरबार आणि शिर्डी या उत्तर महाराष्ट्रातील तीन मतदारसंघांत काँग्रेस संघटनेकडे तगडे उमेदवार आहेत. त्या जागा श्रेष्ठींनी सोडू नयेत, असे मतही व्यक्त करण्यात आले आहे.
शिर्डीत तर पक्ष कार्यकर्ते जुना हिशेब मांडून बसले आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांच्या राजकीय साम्राज्याला सुरुंग लावणे आवश्यक आहे. त्यांनी केलेला पक्षत्याग चुकीचा होता. त्यांचा मुलगा सुजय यांना हरवण्याची संधी हवी. आपण तिथे लढू, असे तेथील कार्यकर्त्यांचे आग्रही प्रतिपादन आहे. प्रतिस्पर्धी नेते विखेंना गारद करण्यासाठी सक्रिय होतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
पश्चिम महाराष्ट्राबाबतही काँग्रेसच्या बैठकीत अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयामुळे पुणे लोकसभा मतदारसंघही आवाक्यात आल्याचे मत आहे. कोकणात फारशी ताकद नसल्याने भिवंडी या अल्पसंख्याक बहुल मतदारसंघाकडे लक्ष द्यावे अन् मुंबईत एकनाथ गायकवाड तसेच सुनील दत्त यांच्या दक्षिण-मध्य आणि उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघांसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपात आग्रह धरावा, अशी भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्राचे प्रभारी ए. के. पाटील यांच्याशी या मतदारसंघांसंबंधीच्या आढाव्याविषयी सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
‘भारत जोडो यात्रे’नंतर परिस्थिती सुधारली
मंगळवारी (ता. १३) काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधींनी काढलेल्या ‘भारत जोडो यात्रे’नंतर पक्षाची परिस्थिती सुधारली होती. आता कर्नाटक विजयानंतर तर भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसकडे पाहिले जाते आहे, असे एका ज्येष्ठ नेत्याने नमूद केले.