आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षांची तयारीला सुरुवात झालेली असतानाच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नेतेमंडळी स्वतःचा पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत.केवळ ठाकरे गट नाही, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक जण शिवसेना शिंदे गटात जाताना दिसत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.शिंदे गटासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मीडियाशी बोलाताना जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये गेले असल्याने पक्षातील निष्ठावंत अशा भाजप सहकाऱ्यांना कुठे बसवायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे, असा खोचक टोला लगावत, भाजपचा अंतर्गत प्रश्न असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आणि आता शिंदे गटातील लोक नव्याने कधी भाजपवासी होतील, हे सांगता येणार नाही. या सर्वांच्या ओझ्याखाली निष्ठावंत कार्यकर्ते मागे ढकलले गेले आहेत. भारतीय जनता पक्षात ती अस्वस्थता मोठी आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
शिंदेंची सत्ता, ते मुख्यमंत्री असेपर्यंत पक्षप्रवेश होतील, नंतर…शिंदे गटात गेलेले काही लोक आताच मला भेटले. शिंदे गटात गेलेले आहेत ते तात्पुरते गेले आहेत. शिंदेंची सत्ता आहे, शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सोयी सवलती मिळत असल्याने लोक तिथे जात आहेत. त्यामुळे तिथे गेलेल्या लोकांसाठी आम्ही काही बोलत नाही. एका कार्यकर्त्याने सांगितले की सहा महिने जातो, निधी आणतो आणि परत येतो. महत्त्वाच्या कार्यकर्त्याने अशी परवानगी मागितली. नगरपालिकेत निधी येणे गरजेचे आहे. मी जाऊन या म्हटले, अशी मिश्किल टिप्पणी जयंत पाटील यांनी केली.
दरम्यान, अहमदनगरला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचे समर्थनच केले पाहिजे. याला विरोध करणे आम्ही योग्य समजत नाही. चौंडीला अहिल्यादेवी होळकरांचे वास्तव्य होते. आम्ही संपूर्ण गावाच्या सुधारणांसह निधी द्यायचे काम सुरू केले होते. ते गाव विकसित झाले आहे. चौंडीला अहिल्यादेवी होळकरांचे स्थान असल्याने त्या जिल्ह्याला महत्त्व आहे, असे जयंत पाटील यांनी नमूद केले.