ऑलिम्पिक विजेत्या महिला खेळाडूंच्या आंदोलनामुळं संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांच्यावर पॉक्सोसह विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत मात्र अद्यापही त्यांना अटक झालेली नाही. ही अटक का झालेली नाही याबाबत आता दिल्ली पोलिसांद्वारे मोठी अपडेट समोर आली आहे.
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी ट्विट करत माहिती दिली की, यात म्हटलं की काही मीडिया चॅनेल महिला कुस्तीपटूंद्वारे दाखल खटल्याप्रकरणावर पोलिसांनी अंतिम रिपोर्ट सादर केल्याचे वृत्त प्रसारित केलं आहे.पण ही बातमी पूर्णपणे खोटी असून अद्याप या खटल्याची चौकशी सुरु आहे. आम्हाला अद्याप ब्रिजभूषण सिंहांविरोधात पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत. तसेच संपूर्ण चौकशी केल्यानंतरच याबाबत योग्य अहवाल कोर्टासमोर दाखल केला जाईल. हा आरोपपत्राचा अंतिम रिपोर्ट असू शकतो. कुस्तीपटूंचा दावा सिद्ध करणारा एकही पुरावा अद्याप मिळालेला नाही.
दिल्ली पोलिसांनी रविवारी जंतरमंतर मैदानावर सुरु असलेलं आंदोलन चिरडलं तसेच त्यांना तिथून हटवण्यात आलं. त्यानंतर या खेळाडूंनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. पण शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी त्यांची बाजू सरकारकडं मांडून पाच दिवसांत तोडगा काढू असं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. पण आता त्यांनी आता इंडिया गेटवर आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. पण त्यांना अद्याप या ठिकाणी आंदोलनाला परवानगी मिळालेली नाही.