महायुती समन्वय बैठक, महामंडळ नियुक्त्यांचे पुन्हा वारे;  शिवसेना आणि राष्ट्रवादी आग्रही पण भाजपचे मात्र हे मत

0

राज्यातील विविध महामंडळांवर महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते, प्रमुख कार्यकर्ते यांची नियुक्ती करण्यासंदर्भातील चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या नियुक्त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच होतील असे म्हटले जात असताना तीन पक्षांच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत याविषयी चर्चा करण्यात आली.भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, समन्वयक आशिष कुलकर्णी हे मंत्रालयासमोरील देसाई यांच्या बंगल्यातील बैठकीला हजर होते.

महामंडळांवरील नियुक्त्या आताच करू नयेत असे भाजपचे मत आहे; पण त्या आताच कराव्यात यासाठी शिंदेसेना आणि अजित पवार गट आग्रही असल्याचे सूत्रांनी सांगितले. तिन्ही पक्षांनी महामंडळांवरील नावांची आपापली यादी तयार करावी आणि नियुक्त्या आताच करायच्या की नंतर याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रित बसून करतील असे बैठकीत ठरल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

आगामी निवडणुकांत शक्य तिथे महायुतीच

खा. तटकरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, महामंडळाच्या वाटपाबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. महायुतीच्या जिल्हा व तालुका स्तरावर समन्वय समित्या असाव्यात यावरही आजच्या बैठकीत चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे युती म्हणूनच सामोरे जाण्याची भूमिका असेल, त्या दृष्टीने कसे पुढे जाता येईल, याबाबतही विचारविनिमय झाला.