मुंबई : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने तयारीला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः उद्यापासून मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहेत. एकीकडे महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू असताना आघाडीतील तीनही पक्षांनी बैठक घेऊन वातावरण तापवयाला सुरुवात केली आहे.
कर्नाटक विधानसभेतील काँग्रेसच्या विजयानंतर विरोधी पक्षांना बळ आले. लोकसभेची निवडणूक एकत्र लढण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. महाराष्ट्रात विरोधातील महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेऊन जागावाटपाबाबत चर्चाही सुरू केली आहे. कोणी किती जागा लढवाव्यात, याची प्राथमिक चर्चाही केली आहे. त्यानंतर प्रथम शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मातोश्रीवर मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेतला.
शिवसेनेने आढावा बैठक घेताना संबंधित मतदारसंघातून कोण जोरदार टक्कर देऊ शकतो, त्याबाबची उमेदवारांची चाचपणी केली आहे. शिवसेनेच्या पातळीवर काही नावांची चर्चाही झाली आहे. शिवसेनेनंतर काँग्रेस पक्षानेही आपल्या नेत्यांची आणि जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली आहे. त्या काँग्रेसच्या वाट्याला कोणते मतदारसंघ येऊ शकतात, याची वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्याचे समजते.
आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. उद्या (ता. ३० मे) आणि परवा (ता. ३१ मे) मतदारसंघनिहाय लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने आढाव घेण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. स्वतः पवार हे मतदारसंघातील पक्षाची स्थिती, संभाव्य उमेदवार आणि जिंकून येण्याची क्षमता याची चाचपणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची उद्यापासून होणारी बैठक महत्वाची मानली जात आहे.