महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सातत्याने धक्कादायक घडामोडी घडत आहे. या घडामोडींना खरी सुरुवात २०१९ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाली. मात्र याचा खरा क्लॅमेक्स १० महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडामुळे पाहायला मिळाला. नरेंद्र मोदी सरकारला आता नऊ वर्षे पूर्ण झालेली आहेत. पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका लागतील. मोदी सरकाकरविषयी सामान्यांच्या मनात काय भावना आहेत, याचा कानोसा सकाळ माध्यम समूहाच्या वतीने घेण्यात आला.
सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत महाराष्ट्रातील मतदारांना काय वाटतं? याचं सर्वेक्षण ‘सकाळ’ने केलं आहे. यामध्ये जनतेच्या भावना जाणून घेण्यात आल्या. एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी शिवसेनेत अभूतपूर्व बंड घडवून आणत, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडलं. तसेच भाजपसोबत जावून मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यामुळे शिंदे यांचं बंड यशस्वी झालं, असं सांगण्यात येतय.
शिवाय शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हही मिळालं. मात्र सकाळने केलेल्या सर्वेमध्ये 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी मतदान करताना आपण कोणात्या पक्षाची निवड कराल? असा प्रश्न जनतेला सकाळ सर्वेक्षणात विचारण्यात आला.
यावर वर एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे. तर सर्वात जास्त फायदा भाजपला होताना दिसत आहे. या सर्वेमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष बनू शकतो, भाजपला ३३.८ टक्के, लोकांची पसंती आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात कमी म्हणजे ५.५ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्याच प्रमाणे काँग्रेसला १९.९ टक्के, राष्ट्रवादीला १५.३ टक्के, उद्धव ठाकरे गटाला १२.५ टक्के, शेकाप ०.७ टक्के, वंचित आघाडी २.९ टक्के येवढी पसंती मतदारांनी दिली आहे.
या सर्वेनुसार राज्यात पुन्हा महाविकास आघाडी अग्रेसर होताना दिसत आहे. मविआतील पक्षांच्या टक्केवारीची बेरीज केली तर काँग्रेसला १९.९ टक्के, राष्ट्रवादीला १५.३ टक्के, उद्धव ठाकरे गटाला १२.५ टक्के म्हणजेच एकूण ४७.७ टक्के लोकांनी मविआला पसंती दिर्शवली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेच्या टक्केवारीची बेरीज केली तर ती ३९.३ येवढी दिसत आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सोबत जवळपास ४० आमदार आणि १३ खासदार गेले आहेत. तरी देखील एकनाथ शिंदे यांना जनतेने नाकारलं आहे का? असा प्रश्न उपस्थित होते. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे अवघे ५ खासदार आणि १६ आमदार आहेत, तरी देखील लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाला पसंती दिली आहे.